किवळे : विकासनगर परिसरात मंगळवारी वादळी पावसानंतर खंडित झालेला वीजपुरवठा ३२ तासांनी सुरू झाला. मात्र, पुन्हा गुरुवारी सहा तास वीजपुरवठा बंद ठेवून महावितरणने गुरुवारपर्यंत ३८ तास वीज पुरवठा बंद ठेवून नागरिकांना अक्षरश: हैराण केले. भूमिगत केबलमध्ये निर्माण झालेला दोष दूर करण्याकडे वेळीच लक्ष न दिल्याने सलग ३२ तास वीजपुरवठा खंडित राहिला असून, महावितरणच्या अधिकार्यांनी गुरुवारी वीजपुरवठा खंडित करणार नाही, असे आश्वासन देऊनही ते न पाळल्याने नागरिकांनी तीव्र नाराजी व्यक्त केली आहे. विकासनगरच्या काही भागात मंगळवारी वादळी पावसाने विद्युतवाहिन्या तुटल्या होत्या. त्या भागातील वीजपुरवठा मंगळवारी रात्री उशिरा सुरू करण्यात आला होता. मात्र उर्वरित मोठी गृहसंकुले, बहुमजली इमारती असणार्या भागातील वीजपुरवठा सुरळीत झाला नव्हता. या भागात विजेचे काही ठिकाणी एक, तर काही ठिकाणी दोन फेज गुल होते. याबाबत मंगळवारी रात्री संबंधित अधिकार्यांनी, दोष सापडत नाही; बुधवारी सकाळी अर्ध्या तासात काम होईल, असे सांगितले होते. मात्र, बुधवारी सकाळी वीजपुरवठा सुरळीत न झाल्याने नागरिकांनी संपर्क साधला होता. मात्र दुरुस्तीच्या कामाबाबत चालढकल होत असल्याने मिळालेल्या वेगवेगळ्या उत्तरांमुळे स्पष्ट झाले असल्याचे नागरिकांनी सांगितले. नागरिकांनी भोसरी व निगडी प्राधिकरण येथील डी. पी. पेठकर व संजय घोडके या वरिष्ठ अधिकार्यांशी संपर्क साधल्याने वेगाने सूत्रे हलली. महामार्गाजवळ भूमिगत केबलमध्ये असणारा दोष शोधण्यात आला व कामाला सुरुवात झाल्यानंतर स्थानिक शाखा अधिकारी कुहार्डे व स्थानिक नागरिकांनी जेसीबी यंत्र व इतर मदत उपलब्ध करून दिल्याने केबल दुरुस्ती बुधवारी रात्री साडेअकराच्या सुमारास पूर्ण होऊन वीजपुरवठा सुरळीत झाला. मात्र, गुरुवारी पुन्हा वीजपुरवठा खंडित न करण्याबाबत विनंती करूनही तो बंद ठेवल्याने नागरकांची गैरसोय झाली. (वार्ताहर )
तब्बल ३२ तासांनी वीजपुरवठा सुरळीत
By admin | Updated: May 30, 2014 05:01 IST