येरवडा : विश्रांतवाडी ते विमानतळ रस्त्यावर वारंवार होणाऱ्या अपघातांमुळे या रस्त्यावर रिफ्लेक्टर, गतिरोधक व दुभाजक बसविण्याची मागणी वाहनचालकांबरोबरच नागरिक करू लागले आहेत.या रस्त्यावर आठवड्यातून किमान २-३ अपघात होत असतात. यामुळे हा रस्ता वाहतुकीसाठी धोकादायक बनला आहे. हा रस्ता मोठा असल्याने वाहने वेगाने धावत असतात. या ठिकाणी असलेल्या दुभाजकाची उंची ही रस्त्याच्या दृष्टीने फार कमी आहे. त्यामुळे या रस्त्यावर हे दुभाजक दिसत नसून यामुळेही अपघात होत असतात. हे दुभाजक असून नसल्यासारखेच आहेत. रात्रीच्या वेळेस तर हे दुभाजक दिसत नसल्याने त्यावर गाडी आदळून अनेक अपघात झाले आहेत. यातील काही अपघातांची पोलीस दप्तरी नोंदही नाही. रस्ता तयार होऊन अनेक दिवस झाले. मात्र, अद्यापपर्यंत या ठिकाणी मोठे दुभाजक का बसविण्यात आले नाही, असा प्रश्न नागरिकांमधून उपस्थित होत आहे. या ठिकाणी पालिकेने गतिरोधक व रिफ्लेक्टर बसवून दुभाजकांची उंची वाढवावी, अशी मागणी नागरिकांनी केली असून, यावर योग्य त्या उपाययोजना न केल्यास तीव्र आंदोलन करण्याचा इशारा सामाजिक कार्यकर्ते विनोद पवार यांनी दिला आहे. (वार्ताहर)
विश्रांतवाडी-विमानतळ रस्त्यावर वाढले अपघात
By admin | Updated: August 12, 2015 04:37 IST