पुणे : वयाच्या १५ व्या वर्षी माझ्यावर एका व्यक्तीने एकतर्फी प्रेमातून अॅसिड हल्ला केला. त्यानंतर माझे आयुष्य संपलेच होते. आईने दिलेल्या हिमतीच्या जोरावर मी चेहरा लपवायचा नाही, असे ठरवले. लोकांकडून अनेक नकारात्मक शेऱ्यांना सामोरे जावे लागले. मात्र, त्या सर्व नकारात्मक शेऱ्यांना एक आव्हान म्हणून स्वीकारत सौंदर्याची वेगळी परिभाषा मांडण्याचा प्रयत्न केला. हे अॅसिडहल्ल्यानंतर नव्या उमेदीने आयुष्याची सुरुवात करण्याऱ्या लक्ष्मी साचे बोल ऐकताना सभागृह भारावून गेले.‘मुक्तांगण’च्या संस्थापिका डॉ. अनिता अवचट यांच्या स्मृतिदिनानिमित्त प्रतिवर्षी देण्यात येणाऱ्या संघर्ष सन्मान पुरस्कार रविवारी ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्त्या सुनीती सु. र. व लक्ष्मी सा यांना प्रदान करण्यात आला. त्या वेळी सा बोलत होत्या. ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते अनिल अवचट, डॉ. मुक्ता पुणतांबेकर उपस्थित होत्या. डॉ. आनंद नाडकर्णी यांनी पुरस्कारार्थींशी संवाद साधला.लक्ष्मी सा म्हणाल्या, ‘‘अॅसिडहल्ल्याच्या घटनेनंतर पुढचा प्रवास फारच बिकट होता. मी माझी शाळा पूर्ण केली. त्याचबरोबर ब्युटिशियन, शिवणकाम, संगणक यांचेही प्रशिक्षण घेतले. मात्र, माझ्या चेहऱ्यामुळे मला कुठेही काम मिळत नव्हते. माझ्यासारखी परिस्थिती अॅसिडहल्ल्यातील अनेक मुलींची होती. पीडित महिलांचे पुनर्वसन करण्याचे काम आम्ही करत आहोत.’’ डॉ. राणी बंग यांनी डॉ. अनिता अवचट यांच्या आठवणींना उजाळा दिला. (प्रतिनिधी)
नकारात्मकतेचे आव्हान स्वीकारले
By admin | Updated: February 13, 2017 02:16 IST