लोकमत न्यूज नेटवर्क
डिंभे : कुकडी प्रकल्पांतर्गत येणाऱ्या पाचही धरणांच्या पाणीसाठ्यात सध्या झपाट्याने घट होवू लागली आहे. आज मितीस या प्रकल्पात ६६४४.४८ (दलघफू) एवढा उपयुक्त पाणीसाठा असून प्रकल्पात केवळ २२.३९ टक्के इतका पाणीसाठा शिल्लक राहिला आहे. मागील वर्षी आजच्या तारखेस प्रकल्पात २२.९८ टक्के पाणीसाठा शिल्लक होता. शिल्लक पाण्याचे काटकसरीने व नियोजनपूर्वक वापर करण्याचे आवाहन कुकडी पाटबंधारे विभागाकडून करण्यात आले आहे. उन्हाळ्याची तीव्रता लक्षात घेता प्रकल्प धरण पाणलोट क्षेत्रातील पाणी योजना धोक्यात येवून धरणाच्या आतील गावांना तीव्र पाणी टंचाईचा सामना करावा लागण्याची चिन्हे आहेत.
जुन्नर तालुक्यातील येडगाव, माणिकडोह, वडज, पिंपळगाव तर आंबेगाव तालुक्यातील डिंभे धरण या पाच धरणांचा मिळून कुकडी प्रकल्प तयार होतो. या प्रकल्पाच्या माध्यमातून पुणे जिल्हयातील आंबेगाव, जुन्नर, शिरूर व अहमदनगर जिल्हयातील पारनेर, श्रीगोंदा, कर्जत तसेच सोलापूर जिल्ह्यातील करमाळा अशा एकुण सात तालुक्यामधील सुमारे १ लाख ५६ हजार २७८ हेक्टर एवढे क्षेत्र कालव्यांव्दारे सिंचनाखाली येत आहे.
येडगाव धरणची पाणी साठवण क्षमता ३.३ टीएमसी एवढी असून सध्या या धरणात ३३.६४ टक्के एवढा पाणीसाठा शिल्लक आहे.
माणिकडोह धरणाची एकुण साठवण क्षमता १०.८८ टीएमसी एवढी आहे. सध्या या धरणात केवळ ८ टक्के एवढा पाणीसाठा शिल्लक आहे. वडज धरणाची एकुण साठवण क्षमता १.२७१ टीएमसी एवढी असून सध्या या धरणात ३०.३२ टक्के पाणीसाठा शिल्लक आहे.
पिंपळगाव जोगा धरणाची पाणी साठवण क्षमता ७.६८७ टीएमसी एवढी आसून आजतागायत या धरणात (उणे)४.७३टक्के एवढा पाणीसाठा शिल्लक आहे.
डिंभे धरणाची १३.५०० टीमसी पाणी साठवण क्षमता आहे. आज मितीस या धरणात ३८.५८टक्के एवढा पाणीसाठा शिल्लक आहे. तर २ मे रोजी घेतलेल्या आकडेवारी नुसार विसापुर व चिल्हेवाडी या धरणांत अनुक्रमे १९.५५ व २४.३९ टक्के एवढा पाणीसाठा शिल्लक होता.
मागील वर्षाची तुलनेत यंदाच्या उन्हाळयात प्रकल्पातील सर्वच धरणांतील पाणाीसाठ्यात घट झाली आहे. सध्या या प्रकल्पातून आवर्तन सुरू आहे. यामुळे आज कुकडी प्रकल्पात जवळपास २२.३९ टक्के एवढा पाणीसाठा शिल्लक आहे. वाढती उन्हाची तीव्रता व पाण्याच्या मागणीमुळे यंदा या प्रकल्पातील धरणे कोरडी होण्याची शक्यता निर्माण झाली आहे. मे महीना सुरू होताच उन्हाळयाची तीव्रता वाढण्यास सुरुवात होते. पूर्वी प्रमाणे पावसाळाही वेळेवर सुरू होत नसल्याने जुलै महिन्यापर्यत प्रकल्पातील पाण्याचे नियोजनपूर्वक वापर करणे गरजेचे आहे. सध्या या प्रकल्पात असणाऱ्या पाण्यावरच सगळ्यांच्या भीस्त आहे. प्रकल्पांतर्गत येणाऱ्या पाचही धरणाच्या आतील आदिवासी गावांना दरवर्षीच पाण्याच्या झळा सहन कराव्या लागतात. यंदाही लाभक्षेत्रासाठी पाण्याचा मोठ्या प्रमाणात वापर झाल्यास आदिवासी गावांतील पाणी योजना अडचणीत येणार आहेत. यामुळे प्रकल्पाच्या आतील गावांना पिण्याच्या पाण्यासाठी तारेवरची कसरत करावी लागणार आहे.
चौकट
कुकडी प्रकल्पातून सध्या उन्हाळी आवर्तन सुरू आहे. उजवा कालवा १८० तर डावा कालवा ६०० क्युसेक्सने सुरु आहे. त्यामुळे धरणांतील पाणी पातळी झपाट्याने कमी होत आहेत. हे आवर्तन पुढील महिभर सुरू राहणार असल्याने धरणपाणलोट क्षेत्रातील गावांना पाणी टंचाई जाणवू शकते. लाभ क्षेत्रातील गावांनी उपलब्ध पाणीसाठ्याचा काटकसरीने वापर करावा
-तानाजी चिखले- (उपअभियंता कुकडी प्रकल्प नारायणगांव)
फोटो : कुकडी प्रकल्पातील डिंभे धरण ४०.३९ एवढा पाणीसाठा शिल्लक आहे.