पुणे : मिळकतकर थकबाकीदारांसाठी जाहीर केलेल्या अभय योजनेच्या पहिल्या टप्प्यात पालिकेला एकाच महिन्यात तब्बल १८५ कोटी रुपये मिळाले आहेत. दुसऱ्या टप्प्यातही प्रशासनाला मोठी अपेक्षा आहे. या वर्षी एकूण ९८१ कोटी रुपये जमा झाले असून, मार्चअखेरीस फक्त मिळकतकराची एकूण जमा हजार कोटींपेक्षा जास्त होईल, असा प्रशासनाचा अंदाज आहे.अतिरिक्त आयुक्त राजेंद्र जगताप यांनी ही माहिती दिली. मिळकतकर विभागाचे उपायुक्त सुहास मापारी या वेळी उपस्थित होते. थकबाकीदारांना दंडाच्या रकमेत जानेवारीत ७५ टक्के व फेब्रुवारीत ५० टक्के सवलत देणारी अभय योजना पालिकेने या वर्षी प्रथमच जाहीर केली. त्यामुळे पालिकेच्या तिजोरीत मोठीच भर पडली आहे. काल या योजनेच्या अखेरच्या दिवशी पालिकेत तब्बल २१ कोटी रुपये जमा झाले. आतापर्यंत एकूण ८६ हजार ७३९ जणांनी या योजनेचा लाभ घेतला. योजनेचा दुसरा ५० टक्के सवलतीचा टप्पा आजपासून (दि. ११) सुरू झाला असून तो ११ मार्चपर्यंत सुरू राहणार आहे.काही पदाधिकारी व नगरसेवकांनी ७५ टक्के सवलतीची मुदत वाढवण्याचा प्रस्ताव दिला होता, मात्र प्रशासनाचा तसा काहीही विचार नसल्याचे जगताप यांनी ठामपणे सांगितले. थकबाकीदारांपैकी अनेक प्रकरणे न्यायालयात आहेत. त्यात काही करणे शक्य नव्हते. तसेच, मोबाईल टॉवर थकबाकीदारांना योजनेतून वगळण्यात आले. सन २००७ पूर्वीच्या मोबाईल टॉवर्सना कर लावू नये, अशा सरकारच्या त्या वेळी सूचना होत्या. काही प्रकरणे दुबार म्हणजे दोन वेळा करआकारणी झालेली आहेत. त्यामुळे या प्रकारचे थकबाकीदार योजनेतून वगळले गेले अन्यथा यापेक्षा जास्त वसुली झाली असती, असे जगताप म्हणाले. लोकअदालतीद्वारे अनेक प्रकरणे निकाली काढण्यात पालिकेला यश आले आहे, असे त्यांनी सांगितले.शहरातील अनेक मिळकतींना कर लावला जात नाही. अशा मिळकती शोधून काढण्यासाठी मिळकतकर विभागात यापुढे जीपीएस (ग्लोबल पोझिशनिंग सिस्टिम) वापरण्यात येणार आहे. त्यामुळे अशा मिळकती शोधता येतील. यातून किमान २ लाख मिळकती सापडतील व त्यांनाही कर आकारणी केली जाईल. यामुळेही उत्पन्नात वाढ होणार आहे. या वर्षी प्रथमच या विभागाच्या वतीने १ हजार कोटी रुपयांपेक्षा जास्त उत्पन्न जमा केले जाईल, असे जगताप यांनी सांगितले. (प्रतिनिधी)
पालिकेला महिन्यात १८५ कोटी
By admin | Updated: February 12, 2016 03:37 IST