- संजय बारहाते, टाकळी हाजी
शिरूर तालुक्यात ३६२ अंगणवाड्या मंजूर असून त्यापैकी फक्त १९१ च अंगणवाड्यांना इमारती बांधून दिल्या आहेत. उर्वरित १७१ अंगणवाड्यांतील बालकांना अद्यापही हक्काचा निवारा मिळालेला नाही आहे.याबाबत शिरूरचा गटविकास अधिकारी संजय चिल्लाळ व बालविकास प्रकल्पाधिकारी व सहायक गटविकास अधिकारी ए. व्ही. बांगर यांनी दिलेल्या माहितीनुसार शिरूर तालुक्यामध्ये बालविकास प्रकल्पाचे शिरूर व शिक्रापूर असे दोन विभाग आहेत. शिरूर प्रकल्पामध्ये १८४ अंगणवाड्या सुुरू आहेत. त्यापैकी १०४ अंगणवाड्यांनाच स्वत:च्या इमारती आहेत. इतर ८० अंगणवाड्यांमधील मुलं, ग्रामपंचायत इमारत, समाजमंदिर, प्राथमिक शाळा, व्हरांडा, मंदिरांमध्ये बसतात.शिक्रापूर प्रकल्पामध्ये १७८ अंगणवाड्या मंजूर असून स्वत:च्या इमारती मात्र फक्त ८७ आहेत, तर ९१ ठिकाणी इमारत नाही. येथेही प्राथमिक शाळा, समाजमंदिर, खासगी जागा, ग्रामपंचायत इमारत अशा ठिकाणी मुले बसतात. शिरूर तालुक्याला सन २०१५-१६ मध्ये २१ अंगणवाड्या, तर १६-१७ मध्येसुद्धा २१ अंगणवाड्या मंजूर झाल्या आहेत. या वर्षी टाकळी हाजी, भिल्लवस्ती, शिनगरवाडी, फाकटे, मांडवगणफराटा, नागरगाव, दुरळगाव (जांभळकरवस्ती), संविदने, कवठे येमाई, माळी मळा, इनामवस्ती, हिवरे कुंभार, खैरेवाडी (खैरेमळा), पिंपळे जगताप, तळेगाव ढमढेरे (चिमणा पिरमळा) इंगळेनगर, शिंगाडवाडी, फलकेवाडी, वढू पुनवर्सन, शास्ताबाद, गणेगाव, खालसा, आंढळगाव (पांढरेवस्ती) या ठिकाणी मंजूर झाल्या असून प्रत्येकी ६ लाख रुपये याप्रमाणे १ कोटी ७ लाख रुपये मंजूर झाले असून निविदा काढून लवकरच कामे सुरू होतील. मात्र उर्वरित १७१ अंगणवाड्यांना हक्काचा निवारा मिळेल का? असा प्रश्न लोकांमधून केला जात आहे.इंग्रजी माध्यमांच्या शाळांची स्पर्धा सध्या जि. प. शाळांना करावी लागत आहे. इंग्रजी माध्यमांच्या शाळांनी नर्सरीपासून वर्ग सुरू केले आहेत. अंगणवाडी हा लहान मुलांचा तसेच जि. प. शाळेच्या प्रवेशाचा श्रीगणेशा आहे. त्यासाठी अंगणवाडी सुसज्ज असणे आवश्यक आहे, म्हणून जिल्हा परिषदेने अंगणवाड्यांना भौतिक सुविधा निर्माण करून देण्याची गरज असल्याचे पंचायत समितीच्या सदस्या डॉ. कल्पना पोकळे यांनी ‘लोकमत’शी बोलताना सांगितले.शिरूर तालुक्यात उर्वरित अंगणवाड्या मंजूर होण्यासाठी जिल्हा परिषद अध्यक्षांना भेटणार असून, रस्ते करून का होईना, पण शाळा अंगणवाड्यांना निधी द्या? अशी पोकळे यांनी मागणी केली.