वडगाव मावळ : माळीनगर येथे जुना मुंबई-पुणे महामार्गावर बुधवारी सकाळी सहाच्या सुमारास अज्ञात वाहनाला बाजू देताना कंटेनर चालकाचा ताबा सुटला. सुदैवाने झोपड्यांच्या अलीकडेच चरात कंटेनर थांबल्याने मोठी दुर्घटना टळली. काळ आला होता पण वेळ आली नव्हती अशी भावना झोपड्यातील रहिवाशांनी व्यक्त केली. एनएल ०१ जी ७८८४ क्रमांकाचा कंटेनर जुना मुंबई महामार्गावरुन बुधवारी सकाळी सहाच्या सुमारास मुंबई बाजूला निघाला होता. वडगाव येथील माळीनगर हद्दीत अज्ञात वाहनाला बाजू देताना चालकाचा ताबा सुटून कंटेनर खचलेल्या साइडपट्टीवरून घसरून बाभळीच्या लाकडाला अडकल्याने वाचला. तो झोपड्यांवर पलटी होता होता वाचल्याने जीवित व वित्तहानी टळली. अपघातामुळे झोपड्यातील रहिवाशांची धावपळ उडाली. धोकादायक कंटेनर पोलीस कर्मचारी सदाशिव पिरनणवार, संदीप चौधरी व सुभाष गोमे यांनी वेळीच धाव घेऊन क्रेनच्या साहाय्याने बाजूला केला.या घटनेनंतर चालक फरार झाला होता. महामार्गावरील साइडपट्ट्या खचल्या आहेत. ओढे व नाल्यांच्या पुलांच्या संरक्षक कठड्यांची दुरवस्था आहे. दुभाजक कमी उंचीचे असून त्यांचीही दुरवस्था आहे. महामार्गालगत अवजड वाहने उभी केल्याने इतर वाहन्नचालकांना धोका निर्माण होतो. दिशादर्शक व सूचनाफलकांची दुरवस्था आहे. हॉटेल, पेट्रोलपंप व जोड रस्त्यांमुळे महामार्गावर खडी साचल्याने अपघाताला निमंत्रण मिळत आहे. साइडपट्ट्या, पुलांचे कठडे व इतर दुरुस्ती करण्याची मागणी नागरिकांनी केली. (वार्ताहर)
‘काळ आला होता पण वेळ आली नव्हती’
By admin | Updated: July 9, 2015 02:35 IST