पिंपरी : शिवसेनेतील काही पदाधिकारी व कार्यकर्ते भारतीय जनता पक्षात प्रवेश करीत आहेत. परंतु, मित्र पक्षातील पदाधिकाऱ्यांना भाजपामध्ये प्रवेश देणार नाही. महापालिका निवडणुकीमध्ये युतीसाठी आम्ही अनुकूल असून, यापूर्वी झालेल्या युतीतील चुका सुधारण्यात येतील, असा आशावाद शहराध्यक्ष लक्ष्मण जगताप यांनी व्यक्त केला. शिवसेनेचे भोसरी विधानसभा मतदार संघाचे उपविभागप्रमुख राजाभाऊ बोराटे यांनी दोन दिवसांपूर्वी भाजपामध्ये प्रवेश केला. त्यामुळे युतीमध्ये वादंग निर्माण झाला असून, एकमेकांवर टीका सुरू आहे. त्या विषयी जगताप म्हणाले, ‘‘शहरात भाजपाकडून युतीमध्ये कोणतेही तोडाफोडीचे राजकारण सुरू नाही. मित्र पक्षातून काही पदाधिकारी स्वत:हून भाजपात प्रवेशासाठी इच्छुक आहेत. परंतु, यापुढे शिवसेनेतून कोणत्याही पदाधिकाऱ्यांना भाजपात घेण्यात येणार नाही.’’ गेल्या काही दिवसांत सत्ताधारी राष्ट्रवादी काँग्रेसच्या नगरसेवकांच्या भ्रष्टाचाराचे एक एक प्रकरण उजेडात येत आहे. त्या विरोधात स्थानिक नगरसेवक आंदोलने करीत आहेत. परंतु, बीआरटीसह काही गंभीर प्रकरणातील भ्रष्टाचाराच्या चौकशीसाठी मुख्यमंत्र्यांकडे पाठपुरावा करीत आहे, असे लक्ष्मण जगताप यांनी पत्रकार परिषदेत सांगितले. खासदार अमर साबळे, उमा खापरे, एकनाथ पवार, सदाशिव खाडे आदी उपस्थित होते. (प्रतिनिधी)
शिवसेना पदाधिकाऱ्यांना भाजपा प्रवेशास मज्जाव
By admin | Updated: August 19, 2016 06:12 IST