शीतल आल्हाट, पिंपरी‘मुले म्हणजे देवाघरची फुले’ असे म्हटले जात असले, तरी शहरातील काही मुले या उक्तीपासून वंचित असल्याचे चित्रही दिसते. आजही बालकामगार नावाची प्रथा अस्तित्वात असल्याचे पाहावयास मिळते. हॉटेलसारख्या ठिकाणी, वीटभट्टी, बांधकाम क्षेत्राच्या ठिकाणी, कचरा जमा करण्याच्या ठिकाणी लहान मुले काम करताना दिसतात. त्यामुळे या मुलांचा संपूर्ण विकास होण्याची शक्यता कमी असते. मुलांच्या शारीरिक, मानसिक, भावनिक अशा सर्वांगीण विकासासाठी समाजातील बालहक्कांसाठी लढणाऱ्या स्वयंसेवी संस्थांची शहरात कमतरता आहे. शहरात अनेक ठिकाणी असंख्य बालके सामाजिक, आर्थिक, शारीरिकदृष्ट्या असुरक्षित आहेत. आर्थिक परिस्थिती योग्य नसल्यामुळे पोट भरण्यासाठी लहान मुलांना नाइलाजास्तव काम करणे अपरिहार्य असते. सध्या ठिकठिकाणी भिकारी म्हणून वावरणाऱ्या बालकामगारांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. प्रमुख रस्ते, चौक, बसथांबे, रेल्वेस्थानक अशा अनेक ठिकाणी लहान मुले भीक मागताना दिसतात. त्यांना खेळणी तसेच मोटारीतील शोभेच्या वस्तू विक्रीसाठी उन्हात उभे राहावे लागते, अशा माध्यमातून बालकांचे शोषण होत आहे. राज्यातील प्रत्येक जिल्ह्यात बालकामगार मुक्तीसाठी विशेष कृती दलाची स्थापना केली गेली आहे. पण, हे दल बालकामगार असलेल्या ठिकाणी तुरळक प्रमाणात छापा मारतात. बाल न्याय अधिनियमानुसार बालकांना जगण्याचा अधिकार, सहभागतेचा अधिकार, विकासाचा अधिकार, सुरक्षतेचा अधिकार आहे. याचाच अर्थ त्यांना शोषणापासून मुक्ततेची कायद्यात तरतूद आहे. परंतु, तरतूद फक्त कागदावरच आहे. घरातील बिकट आर्थिक परिस्थितीमुळे बालकांना काम करावे लागते. हसण्या-खेळण्याच्या, शिक्षण घेण्याच्या वयात दोन वेळच्या जेवणासाठी या मुलांना परिस्थितीशी झुंज द्यावी लागते. बालकांच्या पुनर्वसनाची जबाबदारी शासनाची असून, स्वयंसेवी संस्थांनी पुढाकार घ्यावा, असे मत औद्योगिक क्षेत्रातील कामगारांचे आहे.
बालहक्कांसाठी लढणाऱ्यांची वानवा
By admin | Updated: November 14, 2015 03:04 IST