देहूरोड : केंद्रीय संरक्षण खात्याच्या अखत्यारितील रक्षा संपदा विभागाच्या (ऊॠऊए) संकेतस्थळावर देहूरोड कॅन्टोन्मेंट बोर्डाबाबत देण्यात आलेली माहिती गेल्या काही महिन्यांपासून अपडेट झालेली नसल्याने संकेतस्थळावर बोर्डाचे तत्कालीन मुख्य कार्यकारी अधिकारी व तत्कालीन उपाध्यक्ष यांची नावांसह छायाचित्रे अद्यापही झळकताना दिसत होती.संकेतस्थळ नियमितपणे अपडेट होत नसल्याने देहूरोड बोर्डाची माहिती पाहताना नागरिकांचा संभ्रम निर्माण होत असल्याने बोर्डाचे सीईओ व उपाध्यक्ष नक्की कोण आहेत, असा प्रश्न उपस्थित केला असल्याने लोकमतने सविस्तर वृत्त प्रसिद्ध केल्याने दखल घेत संबंधितांनी माहिती दिल्ली येथील कार्यालयाकडे पाठविण्याबाबत कार्यवाही केल्याने संकेतस्थळ अपडेट करण्यात आले आहे . देहूरोडसह देशातील ६२ कॅन्टोन्मेंट बोर्डाचा कारभार संरक्षण मंत्रालयाच्या अखत्यारितील रक्षा संपदा विभाग महानिर्देशकांच्या नियंत्रणाखाली चालत आहे. सर्व ६२ कॅन्टोन्मेंट बोर्डाची माहिती त्यांच्या संकेतस्थळावर नागरिकांना कोठूनही पाहता येते. या संकेतस्थळावर देहूरोड कॅन्टोन्मेंट बोर्डाची माहिती पाहत असताना नागरिकांना आश्चर्याचा धक्का बसत होता. संकेतस्थळावरील चुकीची माहिती, नावे, छायचित्रे आदी बाबतीत बोर्ड प्रशासनाने संबंधित विभागाला तातडीने त्यांची चूक निदर्शनास आणावी, तसेच नागरिकांचा संभ्रम दूर करण्यासाठी योग्य माहिती व छायाचित्र प्रसिद्ध करणेबाबत कळवावे, अशी मागणी नागरिकांतून होत असल्याने लोकमतने रक्षा संपदा विभाग : देहूरोड कॅन्टोन्मेंटचे सीईओ, उपाध्यक्ष नक्की कोण? नागरिकांचा सवाल - ‘संकेतस्थळ अपडेट होणार कधी? नाव एकाचे -छायाचित्र दुसऱ्याचे या शीर्षकाने सविस्तर वृत्त (२६ जुलैच्या अंकात) प्रसिद्ध केले होते. त्याकरिता पाठपुरावा केला होता. मुख्य कार्यकारी अधिकारी सानप यांनी पदाधिकारी नावे व छायाचित्रे व माहिती दिल्ली येथे संबंधितांना पाठविण्यात येणार असल्याचे सांगितले होते. त्यानुसार कार्यवाही झाली असून, नुकतीच संकेतस्थळावर असणारी माहिती अपडेट झाली असून, सानप , पिंजण व शिंदे यांची छायाचित्रे प्रसिद्ध झाली आहेत. जागरूक नागरिकांनी समाधान व्यक्त केले असून, लोकमतला धन्यवाद दिले आहेत. (वार्ताहर)
देहूरोड बोर्डाचे संकेतस्थळ झाले अपडेट
By admin | Updated: October 13, 2016 01:40 IST