पिंपरी : शहरातील स्मशानभूमींमध्ये पर्यावरणपूरक गॅस शवदाहिनी बसविण्याच्या कामात राष्ट्रवादी काँग्रेसने भ्रष्टाचार केल्याचे आरोप झाल्यानंतर चालू आर्थिक वर्षाच्या महापालिका अर्थसंकल्पात केलेल्या तरतूद रकमेचे वर्गीकरण केल्याचे दाखविण्याचा प्रयत्न सत्ताधारी राष्ट्रवादी काँग्रेसने केला आहे. पळवाट न शोधता राष्ट्रवादी काँग्रेसने या प्रकरणाचा सोक्षमोक्ष लावावा, अशी मागणी होत आहे. प्रशासनाने पिंपळे गुरव, पिंपळे सौदागर, वाकड, दापोडी आणि पिंपरीगाव येथे पाच ठिकाणच्या स्मशानभूमींमध्ये पर्यावरणपूरक गॅस शवदाहिनी बसविण्याच्या खर्चाला मंजुरी घेण्यासाठी स्थायी समिती सभेपुढे प्रस्ताव ठेवला होता. परंतु, या कामात सहा कोटींचा भ्रष्टाचार झाल्याचे निदर्शनास आणून देण्यात आले. त्यामुळे आयुक्त दिनेश वाघमारे यांनी पर्यावरण विभागाचे कार्यकारी अभियंता संजय कुलकर्णी यांना सक्तीच्या रजेवर पाठविले. पाच गॅस शवदाहिनींसाठी सुरुवातीला राबविलेल्या निविदा प्रक्रियेत एका ठेकेदाराने प्रत्येकी २ कोटी ११ लाख आणि दुसऱ्याने प्रत्येकी २ कोटी १२ लाख रुपये दर सादर केले. प्रशासनानेच संगनमतचा ठपका ठेवून फेरनिविदा काढली. प्रशासनाने या प्रकरणी चौकशी सुरू आहे. (प्रतिनिधी)
‘शवदाहिनी प्रकरण; सोक्षमोक्ष लावा’
By admin | Updated: October 13, 2016 01:46 IST