अनिल अंबानीचा पाय खोलात! रिलायन्सची 'ही' कंपनी डिफॉल्टर यादीत; व्याजही चुकवले नाही
By ऑनलाइन लोकमत | Updated: March 7, 2021 14:39 IST
1 / 10मुंबई : रिलायन्स होम फायनान्स (reliance home finance) कंपनी पुन्हा एकदा डिफॉल्टरच्या यादीत गेली आहे. कंपनीकडून यासंदर्भातील माहिती देण्यात आली. पंजाब आणि सिंध बँकेच्या ४० कोटी रुपयांपेक्षा जास्त कर्जाचे पेमेंट भरू शकले नाही. 2 / 10रिलायन्स होम फायनान्स कंपनीने पंजाब अँड सिंध बँकेचे कर्ज वेळेत न चुकवल्यामुळे डिफॉल्टरमध्ये टाकण्यात आले आहे. कंपनीकडे रोख रक्कम असूनही न्यायालयाच्या आदेशामुळे ते त्यांचा वापर करू शकले नसल्याने पेमेंट भरता आले नसल्याचे कंपनीने म्हटले आहे.3 / 10अनिल अंबानींच्या (anil ambani) नियंत्रणाखालील रिलायन्स कॅपिटलची सहाय्यक कंपनी १५ फेब्रुवारी २०२१ रोजी कर्जाची परतफेड करू शकली नाही. कंपनीला ४० कोटींचे कर्ज आणि १५ लाख रुपयांचे व्याज वेळेवर परत करता आले नाही.4 / 10कंपनीने दिलेल्या माहितीनुसार, पंजाब अँड सिंध बँकेकडून पाच वर्षांच्या कालावधीसाठी ९.२५ टक्के दराने २०० कोटी रुपयांचे कर्ज घेतले होते. कंपनीकडे निव्वळ रोख रक्कम एक हजार ५०० कोटींपेक्षा जास्त आहे. मात्र, दिल्ली उच्च न्यायालयाने दिलेल्या आदेशामुळे कंपनी या मालमत्तांचा वापर करू शकत नाही.5 / 10अनिल अंबानी यांच्या नियंत्रणाखालील कंपनीची विविध बँक आणि वित्तीय संस्थांवर ४ हजार ३५८.४८ कोटी रुपयांचे कर्ज आहे. कंपनीवर एकूण आर्थिक भार १३ हजार १२६ कोटी आहे. यात दीर्घकालीन आणि अल्प मुदती अशा दोन्ही प्रकारच्या कर्जांचा समावेश आहे. 6 / 10रिलायन्स कॅपिटल कर्जाच्या ओझ्याखाली आहे. रिलायन्स कॅपिटल नॉन-कन्व्हर्टेबल डिबेंचर्स (एनसीडी) साठी व्याज देण्यास यापूर्वीही अयशस्वी ठरले होते. व्याजाची रक्कम २१ फेब्रुवारी २०२१ रोजी भरायची होती. परंतु, कंपनी ही रक्कम भरू शकली नाही. 7 / 10कंपनीने ३१ जानेवारी २०२० ते ३० जानेवारी २०२१ पर्यंत एचडीएफसी आणि अॅक्सिस बँकेचे हप्तेही भरले नाहीत. कंपनीला अॅक्सिस बँकेला केवळ व्याज स्वरूपात केवळ ७१ लाख रुपये द्यायचे आहेत. तर, एचडीएफसी बँकेला ४.७७ कोटी रुपये द्यायचे आहेत. 8 / 10कंपनीवरील बँका आणि वित्तीय संस्थांचे एकूण कर्ज ७०६ कोटी रुपये आहे. डिसेंबर तिमाहीचा निकाल जाहीर झाला असून, या तिमाहीत कंपनीला एकूण ४ हजार कोटींचे नुकसान झाले आहे, असे कंपनीकडून सांगण्यात आले आहे. गेल्या वर्षी याच तिमाहीत कंपनीला १३५ कोटी रुपयांचे नुकसान झाले होते. 9 / 10सप्टेंबर २०१९ मध्ये केअर रेटिंग एजन्सीने रिलायन्स कॅपिटलचे १७ हजार कोटी कर्ज ‘डी’ ग्रेड डीफॉल्टमध्ये टाकले, यावरून कर्जाच्या देयकाच्या बाबतीत कंपनीच्या स्थितीचा अंदाज यावरून काढता येतो. कंपनीने एचडीएफसीकडून ५२४ कोटी आणि अॅक्सिस बँकेकडून १०१ कोटी कर्ज घेतले आहे. 10 / 10कंपनीने घेतलेल्या कर्जाचा एचडीएफसीचा व्याज दर १०.६० टक्के आहे. तर, अॅक्सिस बँकेचा व्याज दर १३ टक्के आहे. रिलायन्स कॅपिटलची ही डिफॉल्टर यादीत जाण्याची ४९ वी वेळ होती.