परभणी : येथील राजगोपालचारी उद्यानातील जलकुंभाला मुख्य वाहिनी जोडण्याचे काम प्रगतीपथावर आहे. हे काम पूर्ण झाल्यानंतर शहरवासियांना मुबलक पाणी मिळण्याची आशा निर्माण झाली आहे.
येथील राजगोपालचारी उद्यानात सुजल योजनेतून जलकुंभ उभारण्यात आला आहे. तब्बल आठ वर्षांनंतर हे काम पूर्ण झाले असून, आता राहटी येथून येणाऱ्या मुख्य जलवाहिनीला जलकुंभाशी जोडण्याचे काम मनपाने हाती घेतले आहे. चार दिवसांपासून शहरात वाहिनीचे काम केले जात आहे. आणखी दोन दिवस काम पूर्ण होण्यासाठी लागण्याची शक्यता आहे. दरम्यान, अनेक वर्षांच्या प्रतीक्षेनंतर जलकुंभ पूर्ण झाला असून, या जलकुंभातून प्रत्यक्ष पाणी पुरवठा होण्याची प्रतीक्षा नागरिकांना लागली आहे. २० लाख लीटर क्षमतेच्या या जलकुंभात राहटी येथील बंधाऱ्यातून पाणी घेतले जाणार आहे. शिवाजी नगर आणि परिसरातील दहा ते बारा वसाहतींमधील सुमारे ८ हजार घरांना या जलकुंभाद्वारे पाणीपुरवठा होणार आहे.
रस्ता वाहतुकीसाठी बंद
सुपर मार्केट भागात जलकुंभाला जोडणी देण्याचे काम सुरू आहे. त्यासाठी हा रस्ता मधोमध खोदला असून, वाहतुकीसाठी बंद ठेवण्यात आला आहे. कारेगाव रोड भागातून गावात जाणाऱ्या वाहनचालकांना या कामामुळे राजगोपालचारी उद्यानमार्गे जावे लागत आहे. त्यामुळे वाहनचालकांची गैरसोय होत आहे.