परभणी : जिल्ह्यातील महिला शेतकऱ्यांनी शासनाच्या विविध योजनांचा लाभ घेऊन आर्थिक उन्नती करावी, असे आवाहन कृषी अधिकारी पी. बी. बनसावडे यांनी केले.
कृषी विज्ञान केंद्र आणि कृषी तंत्रज्ञान यंत्रणेच्या वतीने २१ ते २३ जानेवारी या काळात असोला, करडगाव, परळगव्हाण आदी गावांतील महिलांसाठी अन्नप्रक्रिया उद्योग या विषयावर प्रशिक्षणाचे आयोजन केले होते. या प्रशिक्षणाच्या उद्घाटनप्रसंगी बी. पी. बनसावडे बोलत होते. कार्यक्रमास कृषी विज्ञान केंद्राचे वरिष्ठ शास्त्रज्ञ डॉ. प्रशांत भोसले यांची प्रमुख उपस्थिती होती. शेतीशी निगडित कामांमध्ये महिलांचा सहभाग महत्त्वाचा ठरतो. मराठवाड्यात शेतीमधील निर्णय प्रक्रियेत महिलांचा सहभाग कमी आहे. या पार्श्वभूमीवर उद्योगाच्या माध्यमातून महिला शेतकरी स्वत:ची स्वतंत्र ओळख बनवून यशस्वी होऊ शकतात, असे डॉ. प्रशांत भोसले यांनी प्रास्ताविकात सांगितले. तीन दिवस चाललेल्या या प्रशिक्षणामध्ये डॉ. अरुण खरवडे यांनी मसाल्याच्या पदार्थांची ओळख तसेच मसल्याचे विविध प्रकार या विषयीचे प्रात्यक्षिक महिलांना दाखविले. जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी एस. बी. आळसे, आत्माचे प्रकल्प उपसंचालक के. आर. सराफ यांच्या उपस्थितीत या प्रशिक्षण शिबिराचा समारोप झाला.