परभणी : संचारबंदी काळात कंपनी सुरू ठेवण्यासाठी परवानगी दिली खरी; परंतु बाजारपेठ बंद असल्याने उत्पादन करून माल विक्री करायचा कसा? असा प्रश्न उद्योजकांसमोर निर्माण झाला आहे. परिणामी उद्योग व्यवसाय ठप्प पडले असून उद्योजक मोठ्या आर्थिक कचाट्यात सापडले आहेत.
संचारबंदी काळामध्ये उद्योग व्यवसाय सुरू ठेवण्याची परवानगी शासनाने दिली आहे. जिल्ह्यात परभणी, गंगाखेड आणि जिंतूर या ठिकाणी औद्योगिक क्षेत्र असून या तीनही ठिकाणी कृषीवर आधारित कंपन्यांची संख्या अधिक आहे. संचारबंदीच्या काळात या कंपन्या अल्प मनुष्यबळावर सुरू ठेवण्यात आल्या ; परंतु दुसरीकडे उत्पादित मालाची विक्री करण्यासाठी बाजारपेठ बंद असल्याने उद्योजक अडचणीत आहेत. त्यामुळे उत्पादन करून करायचे काय? असाही प्रश्न निर्माण होत आहे. दुसऱ्या बाजूला उद्योग व्यवसाय सुरू करून त्यातून निघणाऱ्या उत्पन्नातून कर्जाचे हप्ते, वीजबिल भरणा करण्याएवढेही उत्पन्न मिळत नसल्याने अडचणी वाढल्या आहेत. कंपनी सुरू करण्यासाठी कच्चा माल, स्पेअर पार्ट आदी साहित्य उपलब्ध होत नाही. मालवाहतूक बंद असल्याने उद्योग व्यवसाय जवळपास ठप्प आहेत. त्यातून कर्मचाऱ्यांचा पगार व इतर खर्चही भागविणे शक्य होत नसल्याने जिल्ह्यात उद्योग सुरू असले तरी या उद्योगांची अवस्था अत्यंत बिकट झाली आहे. मागील वर्षीच्या कोरोनाकाळात बसलेली आर्थिक झळ यावर्षी भरून निघेल, अशी अपेक्षा होती; परंतु शासनाच्या दुर्लक्षित धोरणामुळे उद्योजकांना मात्र अडचणींचा सामना करावा लागत आहे. उद्योग सुरू ठेवण्याची परवानगी असली तरीही केवळ १० ते १५ टक्के उत्पन्न या काळात मिळत असल्याने उद्योजक मंडळी चांगलीच अडचणीत आली आहे.
कृषीवर आधारित उद्योगांना कोरोनाच्या दुसऱ्या लाटेत मोठा फटका सहन करावा लागत आहे. कोरोनामुळे निर्माण झालेली स्थिती लक्षात घेता शासनाने कर्जाचे हप्ते माफ करणे अपेक्षित आहे. उद्योग व्यवसायांना सावरण्यासाठी शासनाकडूनच पुढाकार घेण्याची गरज निर्माण झाली आहे.
ओमप्रकाश डागा, परभणी
कोरोना संसर्गकाळात शासनाने उद्योग व्यवसाय सुरू ठेवण्याची परवानगी दिली आहे. त्यानुसार प्रतिबंधक नियमांचे पालन करीत उद्योग सुरू ठेवला; परंतु कच्चा माल आणि इतर अडचणी आहेत. शिवाय, बाजारपेठ बंद असल्याने उत्पादनावर परिणाम झाला आहे.
बाहेती, सेलू
कोरोना संसर्गामुळे वाहतूक ठप्प असल्याने व्यवसाय बंद पडला आहे. मनुष्यबळ उपलब्ध असले तरी कामगारांचे पगारही निघत नाहीत. दोन महिन्यांपासून अडचणींचा सामना करावा लागत आहे.
आनंद भगत, परभणी