फरशा उखडल्या; खिडक्याही तुटल्या
परभणी : येथील जिल्हा सामान्य रुग्णालयात ६ कोटी ८८ लाख रुपये खर्च करून उभारलेल्या बाल रुग्ण विभाग आणि प्रशासकीय इमारतीची दोन वर्षांतच दुरवस्था झाली आहे. काही ठिकाणच्या फरशा उखडल्या आहेत, तर काही ठिकाणी खिडक्याही तुटल्या आहेत.
ग्रामीण प्रवाशांची हेळसांड
परभणी : येथील बसस्थानकावर शहरी प्रवाशांसाठी तात्पुरती शेड उभारली आहे. मात्र, ग्रामीण प्रवाशांसाठी आगार प्रमुखांच्या वतीने कोणतीही सुविधा करण्यात आलेली नाही. त्यामुळे प्रवाशांना गैरसोयींचा सामना करावा लागत आहे. याकडे विभागीय नियंत्रक कार्यालयाने लक्ष देणे गरजेचे आहे.
बंद सिग्नल यंत्रणा सुरू करण्याची मागणी
परभणी : शहरातील वाहतूक सुरळीत करण्यासाठी दहा ते पंधरा वर्षांपूर्वी महानगरपालिकेने चौकाचौकात सिग्नल बसविले होते. सध्या सिग्नल बंद असल्याने केवळ ते शोभेचे झाले आहेत. शहरातील वाढलेली वाहतूक लक्षात घेता, सिग्नल यंत्रणा पुन्हा कार्यान्वित करावी, अशी मागणी आहे.
ठिबक सिंचनचे अनुदान रखडले
देवगावफाटा : कमी पाण्यात सिंचन क्षेत्रात वाढ होऊन उत्पादन क्षमतेत वाढ व्हावी, यासाठी केंद्र शासनाने पंतप्रधान सिंचन योजनेअंतर्गत अनुदान तत्त्वावर ठिबक व तुषार सिंचन योजना राबवून शेतकऱ्यांना प्रोत्साहन दिले जात आहे. याअंतर्गत सेलू तालुक्यातील ५६६ पैकी १२० लाभार्थ्यांचे ३१ लाखांचे अनुदान रखडले आहे.
वाळू उपशाकडे महसूलचे दुर्लक्ष
गंगाखेड : तालुक्यातील गोंडगाव, धारासूर, दुसलगाव आदी ठिकाणांवरून वाळूमाफियांनी मोठ्या प्रमाणात वाळूचा उपसा सुरू केला आहे. वाळूची प्रतिब्रास १० हजार रुपये याप्रमाणे विक्री होत आहे. त्यामुळे सर्वसामान्य नागरिकांना हक्काचा निवारा मिळविण्यासाठी अडचणींचा सामना करावा लागत आहे. याकडे लक्ष द्यावे, अशी मागणी होत आहे.