साधारणत: वर्षभरापूर्वी शहरासाठी नवीन पाणीपुरवठा योजना कार्यान्वित झाली; परंतु अद्यापही पाणीपुरवठा सुरळीत झालेला नाही. शहरातील सर्व प्रभागांमध्ये नवीन जलवाहिनी टाकण्यात आली असून, त्याद्वारे पाणीपुरवठा सुरू झाला आहे. मात्र, तरीही पाण्याचे आवर्तन कमी झालेली नाही. शहरवासीयांना सद्य:स्थितीला ८ दिवसातून एक वेळा पाणी मिळत आहे. सध्या उन्हाळ्याचे दिवस असून, हातपंपाचे पाणी आटले आहे. त्यामुळे नागरिकांना पाणी टंचाई जाणवू लागली आहे. महानगरपालिका प्रशासनाने किमान चार दिवसांतून एक वेळा शहराला पाणीपुरवठा करावा, अशी नागरिकांची मागणी आहे.
दरम्यान, मनपाच्या पाणीपुरवठा विभागाने शहरातील ३ जलकुंभाच्या चाचणीचे काम दोन दिवसांपासून हाती घेतले आहे. या कामासाठी किमान पंधरा दिवसांचा कालावधी लागेल, असे प्रशासनाने स्पष्ट केले आहे. त्यामुळे पंधरा दिवसांनंतर तरी शहरवासीयांना नियमित व मुबलक प्रमाणात पाणी मिळेल, अशी आशा व्यक्त केली जात आहे.