पालम तालुक्यात ६६ ग्रामपंचायतींतर्गत ८२ गावे आहेत. बहुतांश गावांमधील नळ पाणीपुरवठा योजना निकृष्ट कामामुळे बंद पडल्या आहेत. काही नळ योजनांचे वीज बिल थकल्यानेही त्या बंद आहेत. सध्या कडक उन्हाळा सुरू झाला आहे. त्यामुळे तालुक्यात पाणीटंचाई जाणवण्यास सुरुवात झाली आहे. तालुक्यात गतवर्षी समाधानकारक पाऊस पडला. परंतु, जमिनीत पाणी मुरले नसल्याने पाणी पातळी खोल गेली आहे. त्यामुळे टंचाईत वाढ झाली आहे. या अनुषंगाने गटविकास अधिकारी आर.व्ही. चकोर यांच्याशी संपर्क साधला असता ते म्हणाले की, ग्रामीण भागात पिण्याच्या पाण्याची टंचाई निर्माण झाल्यानंतर संबंधित ग्रामपंचायती पंचायत समितीकडे प्रस्ताव सादर करतात. त्यांचा प्रस्ताव आल्यानंतर टंचाई निवारणासाठी उपाययोजनांना प्राधान्य देण्यात येत असल्याचे चकोर म्हणाले. त्यामुळे आता प्रशासकीय उपाययोजनांकडे जनतेचे लक्ष लागले आहे.
पालम तालुक्यात पाणीटंचाईच्या झळा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 8, 2021 04:17 IST