परभणी : आठ वर्षांपासून रखडलेल्या राजगोपालाचारी उद्यानातील जलकुंभाचे काम पूर्ण झाले असून, आता प्रत्यक्ष मुख्य लाइनला जलकुंभ जोडला जात आहे. त्यामुळे या नवीन जलकुंभावरून सुमारे ८ हजार घरांना पाणीपुरवठा केला जाणार आहे. चार दिवसाआड पाणीपुरवठा करण्याचे नियोजन आहे.
शहराचा विस्तार वाढल्यानंतर पाण्यासाठी नागरिकांच होणारी ओढाताण लक्षात घेऊन यूआयडीएसएसएमटी योजनेतून नवी पाणीपुरवठा योजना कार्यान्वित करण्यात आली. मात्र तरीही शहरवासीयांना १३ ते १४ दिवसाआड पाणीपुरवठा होत आहे. शहरातील जलकुंभाचे काम अद्याप पूर्ण झालेले नाही. तसेच जुन्या जलवाहिनीमुळे पाण्याचे नियोजन करताना मनपा प्रशासनाला तारेवरची कसरत करावी लागत होती. येथील राजगोपालाचारी उद्यानात सुजल योजनेतून २० लाख लिटर क्षमतेचा जलकुंभ उभारण्यात आला आहे. तब्बल ८ वर्षांपासून रखडलेल्या या जलकुंभाचे काम पूर्ण झाले असून, शनिवारपासून राहटी येथील रायझिंग लाइनचा पाणीपुरवठा जलकुंभाला जोडण्याचे काम सुरू करण्यात आले आहे. सहा दिवसांमध्ये हे काम पूर्ण केले जाणार आहे. त्यामुळे राहटी जलकुंभावरून रामकृष्णनगर, शिवाजीनगर, संभाजीनगर, विष्णू जिनिंग परिसर, कल्याणनगर, शासकीय अधिकाऱ्यांचे निवासस्थान आदी भागात पाणीपुरवठा केला जाणार आहे. या भागात साधारणत: ८ हजार घरे असून या घरांना थेट राजगोपालाचारी उद्यानातून पाणीपुरवठा होणार आहे. त्यामुळे इतर जलकुंभावरील पाणीपुरवठ्याचा ताण कमी होणार आहे. पर्यायाने शहरवासीयांना चार दिवसाआड पाणी देण्याचे नियोजन करणे शक्य होणार आहे.
ममता कॉलनी जलकुंभावरील तीन झोन होणार कमी
शहरातील ममता कॉलनी जलकुंभावरून पूर्वी ७ झोनमध्ये पाणीपुरवठा केला जात होता. त्यामुळे प्रत्येक झोनला एक दिवस याप्रमाणे पाणीपुरवठ्यासाठी ७ दिवसांचे नियोजन करण्यात आले होते. परिणामी नागरिकांना ७ दिवसातून एकवेळ पाणीपुरवठा होत होता. राजगोपालाचारी उद्यानातील जलकुंभ कार्यान्वित झाल्यानंतर २२ लाख लिटर क्षमतेच्या ममता कॉलनी जलकुंभावर चार झोन शिल्लक राहणार आहेत. त्यामुळे या भागातील नागरिकांना चार दिवसाआड पाणीपुरवठा करणे शक्य होणार आहे. त्याचप्रमाणे टचिंगचा भाग तसेच खंडोबा बाजार परिसरातील जलकुंभावरील पाण्याचा भारही कमी होणार आहे.
जोडणीच्या कामाला प्रारंभ
राजगोपालाचारी उद्यानातील २० लाख लिटर क्षमतेच्या जलकुंभाला राहटी येथून येणाऱ्या मुख्य जलवाहिनीशी जोडणी करण्याचे काम शनिवारी सुरू करण्यात आले. या कामासाठी साधारणत: ६ दिवसांचा कालावधी लागणार आहे. त्यामुळे ६ प्रभागांमधील पाणीपुरवठा ठप्प होणार असला तरी त्यानंतर मात्र या प्रभागांमधील पाणीपुरवठा नियमित होण्यास मदत होणार आहे, अशी माहिती पाणीपुरवठा विभागाचे अभियंता तन्वरी मिर्झा बेग यांनी दिली.