बोरी: जिंतूर तालुक्यातील बोरी येथील पशुवैद्यकीय दवाखान्याची इमारत जीर्ण झाली आहे. त्यामुळे नवीन इमारतीसाठी जिल्हा परिषदेच्या निधीमधून ४० लाख रुपयांचा निधी मंजूर झाला आहे. तसेच या इमारतीच्या बांधकामासही सुरुवात झाली आहे. त्यामुळे लवकरच पशुवैद्यकीय दवाखान्याचा कायापालट होणार आहे.
जिंतूर तालुक्यातील सर्वात मोठी बाजारपेठ म्हणून बोरी गावाकडे पाहिले जाते. या गावाची लोकसंख्या जवळपास ३० हजारांच्या घरात आहे. त्यामुळे परिसरातील ३० ते ४० गावांचा संपर्क बोरी या गावाशी येतो. त्यामुळे साहजिकच जनावरांची संख्याही मोठी आहे. जनावरांना वैद्यकीय उपचारासाठी बोरी येथील पशुवैद्यकीय दवाखाना सोयीचा ठरतो. आजपर्यंत या दवाखान्यात अनेक शस्त्रक्रियांसह जनावरांवर उपचार करण्यात आले. त्यामुळे जनावरांची संख्या दिवसेंदिवस या दवाखान्याकडे वळली आहे. मात्र काही दिवसांपासून पशुवैद्यकीय दवाखान्याच्या इमारतीची अवस्था दयनीय झाली होती. डॉक्टरांना अडचणी येत होत्या. त्यामुळे या पशुवैद्यकीय दवाखान्याला नवीन इमारत बांधावी, अशी मागणी परिसरातील पशुपालकांनी केली. त्यानंतर माजी आ. विजय भांबळे यांच्या पाठपुराव्याने जिल्हा परिषदेतून ४० लाख रुपयांचा निधी मंजूर करण्यात आला. विशेष म्हणजे, या इमारतीचे बांधकामही सुरू झाले आहे. त्यामुळे लवकरच पशुवैद्यकीय दवाखान्याचा कायापालट होण्याची आशा निर्माण झाली आहे.