४६ हजार तक्रारींना केराची टोपली
परभणी : जिल्ह्यात सप्टेंबर व ऑक्टेाबर महिन्यांत अतिवृष्टीने झालेल्या नुकसानीपोटी नैसर्गिक आपत्ती अंतर्गत ३९ हजार ३१७ शेतकऱ्यांनी आणि पीक काढणीनंतर ७ हजार अशा एकूण ४६ हजार शेतकऱ्यांनी तक्रारी दाखल केल्या होत्या. मात्र, या तक्रारींना केराची टोपली दाखविण्यात आली. यामुळे शेतकऱ्यांमध्ये नाराजीचा सूर उमटत आहे.
परभणी शहरात मास्कचे भाव वाढले
परभणी : शहरातील औषधी दुकानांमध्ये एन-९५ मास्क बरोबरच इतर मास्कचे दर मागील आठ दिवसांपासून वाढले आहेत. त्यामुळे नागरिकांना चढ्या दराने मास्क खरेदी करावा लागत आहे. याकडे प्रशासनाचे दुर्लक्ष झाले आहे. त्यामुळे नागरिकांची मोठ्या प्रमाणात लूट केली जात असल्याचे दिसून येत आहे.
सिंचन विहिरींची कामे संथगतीने
परभणी : ग्रामीण भागात उन्हाळ्यातील संभाव्य पाणीटंचाईवर मात करण्यासाठी विभागीय आयुक्तांनी प्रत्येक ग्रामपंचायतींतर्गत सार्वजिनक विहीर खोदण्याचे उद्दिष्ट जिल्ह्याला दिले आहे. मात्र, हे काम संथगतीने सुरू आहे.
तालुक्यांना मिळेनात क्रीडांगणे
परभणी : जिल्ह्यातील नऊही तालुक्यांमध्ये खेळाडूंसाठी तालुका क्रीडांगण उपलब्ध नाही. त्यामुळे शालेय, तालुका व जिल्हास्तरीय क्रीडा स्पर्धा खासगी जागेत घ्याव्या लागत आहेत. जिल्हा क्रीडा अधिकाऱ्यांनी लक्ष देणे गरजेचे आहे.
लाभाऐवजी नुकसानच जास्त
परभणी : निम्न दुधना प्रकल्पाच्या उजव्या कालव्याचे काम निकृष्ट पद्धतीने झाल्यामुळे अनेक शेतकऱ्यांच्या शेतापर्यंत पाणी पोहोचले नाही. ज्या शेतकऱ्यांपर्यंत पाणी पोहोचले त्या शेतकऱ्यांना या पाण्याचा फायदा होण्याऐवजी नुकसान झाले आहे. त्यामुळे शेतकरी संतप्त झाले आहेत.
विजेअभावी शेतकऱ्यांना फटका
परभणी : वीज वितरण कंपनीच्या वतीने थकबाकी असलेल्या शेतकऱ्यांचा वीज पुरवठा खंडित करण्यात येत आहे. त्यामुळे जिल्ह्यातील अनेक शेतकऱ्यांना या वीज बिल वसुली मोहिमेचा मोठा फटका बसला आहे. परिणामी सिंचन खुंटले आहे.
‘रस्त्याच्या कामावर पाणी मारा’
परभणी : जिंतूर-परभणी या महामार्गाचे काम मागील अनेक दिवसांपासून सुरू आहे. मात्र, संबंधित कंत्राटदाराकडून काम सुरू असलेल्या ठिकाणी पाणी मारण्यात येत नाही. परिणामी वाहनधारकांना प्रचंड धुळीचा सामना करावा लागत आहे.