कोरोना संसर्ग रोखण्यासाठी महसूलची यंत्रणा गुंतली असल्याचा फायदा घेत गौण खनिजांची चोरी सुरू केली आहे. याविरुद्ध पोलीस प्रशासनाने मात्र कारवाईचा बडगा उचलला आहे. पूर्णा तालुक्यातील धानोरा काळे या भागातील गोदावरी नदीपात्राजवळ मातीचा उपसा होत असल्याची माहिती स्थानिक गुन्हा अन्वेषण शाखेचे पोलीस उपनिरीक्षक चंद्रकांत पवार, विश्वास खोले यांना मिळाली. त्याआधारे पथकातील कर्मचाऱ्यांनी २३ एप्रिल रोजी पहाटे दीड वाजण्याच्या सुमारास धानोरा काळे परिसरात छापा टाकला. त्यावेळी माती उपसण्यासाठी वापरले जाणारे एक जेसीबी (विनाक्रमांक) तसेच वाळूची वाहतूक करण्यासाठी आणलेला हायवा (एम.एच. २४/जे ८८८०) आणि एक टिप्पर (एम.एच.०४/ सी पी ९५४०) ही तीन वाहने जप्त केली आहेत. तिन्ही वाहनांची किंमत ६२ लाख रुपये एवढी आहे. त्याचप्रमाणे १० हजार रुपयांची माती जप्त करण्यात आली. याप्रकरणी पालम पोलीस ठाण्यात चार आरोपींविरुद्ध गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू असल्याची माहिती पोलिसांनी दिली.
विनापरवाना मातीचा उपसा; ६२ लाखांची वाहने जप्त
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 25, 2021 04:16 IST