सोनपेठ: तालुक्यातील गोदावरी नदीवर शिर्शी येथे १९९९ पासून उभारण्यात येणारा पूल दोन दशकानंतर पूर्णत्वाकडे गेला आहे. त्यामुळे तालुक्यातील नागरिकांना याचा लाभ होणार असून सोनपेठ ते परभणी अंतर कमी होणार आहे.
जिल्ह्याच्या शेवटच्या टोकाला असलेला सोनपेठ तालुका नेहमीच रस्त्यसाठी चर्चेत असतो. तालुक्यातील नागरिकांनी रस्त्यांचा दर्जा सुधारावा, यासाठी ५९ दिवस साखळी उपोषण केले होते. मात्र तरीही रस्त्यांच्या दर्जात कोणतीही सुधारणा झालेली नाही. तर दुसरीकडे तालुक्यातील शिर्शी येथे गोदावरी नदीवर पूल उभारणीसाठी १९९९ मध्ये मंजुरी देण्यात आली होती. त्यानंतर येथील पुलाचे काम सुरु करण्यात आले. मात्र या पुलाचे काम अर्धवट अवस्थेत आल्यानंतर पुन्हा ते बंद पडले. संबंधित गुत्तेदाराने या पुलाचे काम अर्धवट अवस्थेत सोडून दिले. त्यानंतर २०१३ मध्ये या पुलाच्या कामासाठी फेर निविदा काढण्यात आली. त्यासाठी १० कोटी ४१ लाख ९४ हजार रुपयांची प्रशासकीय मान्यता देण्यात आली. त्यानंतर सुरु झालेल्या कामावर ८ कोटी ८० लाख रुपयांचा खर्च झाला. मंदगतीने सुरु असलेल्या या पुलाचे काम १९९ मध्ये सुरु झाले अन् २०२१ मध्ये पूर्णत्वाकडे गेले. या पुलाचा तालुक्यातील नागरिकांना मोठा फायदा होणार आहे. सोनपेठ तालुक्यातील नागरिकांना जिल्ह्याच्या ठिकाणी जाण्यासाठी यापूर्वी गंगाखेड किंवा पाथरीमार्गे परभणी येथे जावे लागत होते. यासाठी जवळपास ९० कि.मी.चा फेरा मारुन हे अंतर पार करावे लागत होते. यामुळे तालुक्यातील नागरिकांचा वेळ व पैसा मोठ्या प्रमाणात खर्च होत होता; परंतु, आता शिर्शी पुलाचे काम पूर्ण झाल्यामुळे ५५ कि.मी.ने अंतर कमी होऊन जिल्ह्याचे मुख्यालय गाठता येणार आहे. त्यामुळे नागरिकांचा वेळ व पैसा वाचणार आहे.
बीड, हिंगोलीचे अंतर होणार कमी
परभणी येथून बीड येथे जाण्यासाठी शिर्शी मार्गाने अंतर कमी होणार आहे. परभणी येथून पाथरी मार्गाने बीडला जाण्यासाठी १४० कि.मी.चे अंतर आहे. तर परभणी-सोनपेठमार्गे १३० कि.मी.चे अंतर पार करावे लागणार आहे. त्यामुळे शिर्शी मार्गाने १० कि.मी.ने अंतर वाचणार आहे. परिणामी या शिर्शी पुलामुळे बीडचे अंतर कमी होणार आहे. तर दुसरीकडे हिंगोली जिल्ह्यातील औंढा नागनाथ व हिंगोलीकडे जाण्यासाठी सोनपेठ येथील नागरिकांना पाथरी किंवा गंगाखेडमार्गाने जावे लागत होतेे. मात्र या पुलामुळे ५० कि.मी.अंतर कमी होणार आहे.
परभणी-शिर्शी - सोनपेठ या मार्गावरील रस्त्याचे काम सुरु आहे. शिर्शी गावातील रस्त्याचे काम पूर्ण झाल्यानंतर हा पूल रहदारीसाठी खुला करण्यात येणार आहे.
-संजय बडे, उपअभियंता सां.बा.