लोकमत न्यूज नेटवर्क
परभणी : जिल्ह्यातील ६० वर्षांवरील २ लाख ५८ हजार २७४ ज्येष्ठांना १ मार्चपासून शासनाकडून मोफत कोरोनावरील लस देण्यात येणार आहे. या संदर्भातील स्पष्ट निर्देशाची जिल्हा प्रशासनाला प्रतीक्षा आहे.
केंद्र शासनाने दोन टप्प्यांमध्ये आरोग्य अधिकारी, कर्मचारी, खाजगी डॉक्टर्स, नर्स तसेच पोलीस, महसूल विभागातील अधिकारी, कर्मचारी आदींना कोरोनाची लस दिली आहे. आता लसीकरण मोहिमेची व्याप्ती वाढविण्यात येत आहे. केंद्र शासनाने देशातील ६० वर्षांवरील सर्वांना तसेच ४५ वर्षांपेक्षा अधिक वय पण व्याधी असलेल्या नागरिकांना १ मार्चपासून कोरोनाची लस घेण्याचा निर्णय घेतला आहे. सर्व शासकीय केंद्रांवर ही लस देण्यात येणार आहे. या अनुषंगाने माहिती घेतली असता जिल्ह्यात ६० वर्षांवरील ज्येष्ठ नागरिकांची संख्या २लाख ५८ हजार २७४ आहे. या नागरिकांना कोरोनाची लस दिली जाणार आहे. या संदर्भात केंद्रीय आरोग्य मंत्रालयाची शुक्रवारी दुपारी व्हिडीओ कॉन्फ्रसिंग झाली. त्यामध्ये या अनुषंगाने चर्चा झाली असल्याचे समजते; परंतु, या संदर्भातील सविस्तर माहिती स्पष्ट झाली नाही. शिवाय लेखी निर्देशही जिल्हा प्रशासनाला अद्याप प्राप्त झाले नाहीत. त्यामुुळे आरोग्य विभागाकडून या बाबत निर्देश येताच तातडीने लसीकरण मोहिमेच्या नियोजनाला प्रारंभ होणार असल्याची माहिती आरोग्य विभागाच्या वतीने देण्यात आली. त्यामुळे महसूल व आरोग्य यंत्रणेला लेखी आदेशाची प्रतीक्षा आहे.
९९ वर्षांपेक्षा अधिकचे १४८० ज्येष्ठ नागरिक
जिल्ह्यात ९९वर्षांपेक्षा अधिकचे १ हजार ४८० नागरिक आहेत. त्यामध्ये जिंतूर विधानसभा मतदारसंघात ४००, परभणी विधानसभा मतदारसंघात १८६, गंगाखेड मतदारसंघात ५१९ आणि पाथरी विधानसभा मतदारसंघात ३७५ नागरिक आहेत. ९० ते ९९ वर्षाची जिल्ह्यात ९ हजार ४६ नागरिक आहेत.
‘‘ वाढत्या वयाबरोबर आम्हा वृद्धांची प्रतिकार शक्ती कमी झाल्याने अनेक आजार जडतात. त्यामुळे कोरोना होण्याची भीती आम्हाला अधिक सतावत आहे. शासनाने ज्येष्ठ नागरिकांना मोफत कोरोनाची लस देण्याचा घेतलेला निर्णय योग्य आहे. यामुळे आमच्या मनातील कोरोनाची भीती दूर होईल.
-मोहनलाल मंत्री, व्यंकटेशनगर, गंगाखेड
‘‘ कोरोनाच्या संसर्गकाळात लॉकडावूनमध्ये काही शिथिलता दिली होती. मात्र पंतप्रधानांनी ज्येष्ठ नागरिकांना बाहेर फिरु नये, असे आवाहन केले होते. ज्येष्ठ नागरिकांना कोरोना होण्याचा अधिक धोका आहे. या पार्श्वभूमीवर त्यांना कोरोना लस देण्याचा निर्णय स्वागर्तहार्य आहे.
-ओमप्रकाश बंग, खडकापुरा गंगाखेड
लॉकडावूनमुळे गेल्या वर्षी घराबाहेर पडता आले नाही. घरातील मंडळीही बाहेर जावू देत नव्हते. कोरोनाविषयीची भीती मनामध्ये होतीच. आता केंद्र ‘‘ शासनाने ज्येष्ठांना लस देण्याचा घेतलेला निर्णय चांगला आहे. त्यामुळे आपण कोरोनाची लस घेणार आहोत.
-विश्वनाथ कदम, गंगाखेड