परभणी : जिल्ह्यातील २ लाख १४ हजार ४३ बालकांना पोलिओ लसीकरण कऱण्याचे उद्दिष्ट प्रशासनाने समोर ठेवले असून, ३१ जानेवारी रोजी १ हजार ७५७ केंद्रांवर पोलिओ डोस दिला जाणार आहे. आरोग्य विभागाने त्यासाठी जय्यत तयारी केली आहे.
पोलिओ आजाराचे समूळ उच्चाटन करण्याच्या उद्देशाने पल्स पोलिओ लसीकरण मोहीम राष्ट्रीय पातळीवर राबविली जाते. ३१ जानेवारी रोजी जिल्ह्यात हे लसीकरण केले जाणार असून, प्रशासनाने त्यासाठीची तयारी केली आहे. रविवारी ० ते ५ वर्षे वयोगटातील ग्रामीण भागातील १ लाख १५ हजार ६००, शहरी भागातील ४२ हजार ४४३, मनपा हद्दीतील ५६ हजार बालकांना पोलिओ डोस दिला जाणार आहे.
दरम्यान, शनिवारी जिल्हाधिकारी दीपक मुगळीकर यांच्या अध्यक्षतेखाली टास्क फोर्सची बैठक घेण्यात आली. यावेळी आरोग्य विभागातील अधिकारी उपस्थित होते. जास्तीत जास्त बालकांना पोलिओ डोस देऊन मोहीम यशस्वी करण्याचे आवाहन मुगळीकर यांनी केले.
२ लाख ८८ हजार लस जिल्ह्याला प्राप्त
शून्य ते पाच वर्षे वयोगटातील २ लाख १४ हजार ४३ बालकांना पोलिओ डोस दिला जाणार आहे. ३१ जानेवारी रोजी जिल्हाभरात ही मोहीम राबविण्यात येणार असून, त्यासाठी आरोग्य विभागाने जय्यत तयारी केली आहे. जिल्ह्यासाठी २ लाख ८८ हजार लस प्राप्त झाली असून, ती पुरेशा प्रमाणात आहे.
३१ जानेवारी रोजी मोहीम राबविल्यानंतरही आरोग्य विभागाच्या पथकांमार्फत घरोघरी जावून लसीकरण केले जाते. त्यासाठी आणखी १२ हजार लस मागविली आहे.