परभणी : कोरोनाबाधित रुग्णांवर उपचार करण्यासाठी ऑक्सिजनची मागणी वाढली असून, जिल्ह्यातील २३१ रुग्णांना प्रति मिनिट ६ ते १५ लीटर ऑक्सिजन दिला जात आहे. बाधित रुग्णांच्या शरीरातील ऑक्सिजनची पातळी लक्षात घेऊन त्यांस कृत्रिम ऑक्सिजनचा पुरवठा केला जात आहे.
दोन महिन्यांपासून जिल्ह्यात कोरोनाबाधित रुग्णांची संख्या वाढली आहे. शासकीय आणि खाजगी रुग्णालयांत उपचार घेणाऱ्या काही रुग्णांना कृत्रिम ऑक्सिजन द्यावा लागत आहे. ऑक्सिजनची आवश्यकता असणाऱ्या रुग्णांची संख्या वाढल्याने जिल्ह्यात मागच्या काही दिवसांपासून ऑक्सिजनचा तुटवडा निर्माण झाला होता. या पार्श्वभूमीवर जिल्ह्यात किती रुग्णांना ऑक्सिजनची आवश्यकता आहे आणि त्यांना किती ऑक्सिजन लागतो, याचा आढावा घेतला.
दोन दिवसांपूर्वी उपलब्ध झालेल्या माहितीनुसार, २ मे रोजी जिल्ह्यातील ४८७ रुग्णांना ऑक्सिजनचा पुरवठा केला जात आहे. जिल्ह्यात वेगवेगळ्या माध्यमातून ४० के. एल. ऑक्सिजनचा साठा उपलब्ध आहे. त्यापैकी ९ के. एल. ऑक्सिजन या रुग्णांना लागते. सर्वाधिक २३१ रुग्णांना मास्क उईथ रिझर्व्हायरने ऑक्सिजन दिले जात आहे. प्रति मिनिट ६ ते १५ लीटर ऑक्सिजनचा पुरवठा करण्याची क्षमता या यंत्राची आहे. त्याचप्रमाणे १११ रुग्णांना नोझल प्राँगच्या साह्याने ऑक्सिजन दिले जात आहे. सद्य:स्थितीला जिल्ह्यात ऑक्सिजनचा पुरेसा साठा उपलब्ध आहे. रुग्णांना ऑक्सिजनचे सुरळीत वितरण करण्यासाठी प्रशासनाने यंत्रणा निर्माण केली असून, दररोज वापर होणाऱ्या ऑक्सिजन साठ्यावर नियंत्रण ठेवण्यासाठी जिल्हा प्रशासनाने अधिकाऱ्यांची नियुक्ती केली आहे.
२८ रुग्णांना लागतो प्रति मिनिट ३० लीटर ऑक्सिजन
जिल्ह्यातील २८ रुग्णांची प्रकृती गंभीर असल्याने त्यांना मोठ्या प्रमाणात ऑक्सिजन पुरवठा करावा लागत आहे. या रुग्णांना प्रति मिनिट ३० लीटर ऑक्सिजन दिले जात आहे. रुग्णांना ऑक्सिजन पुरवठा करणारी विविध यंत्रे उपलब्ध असून, रुग्णांच्या प्रकृतीनुसार आणि त्यांच्या आवश्यकतेप्रमाणे ऑक्सिजन दिले जात आहे.
३१ के.एल. ऑक्सिजन शिल्लक
सोमवारी मिळालेल्या माहितीनुसार, जिल्ह्यात ४० के.एल. ऑक्सिजन साठा उपलब्ध असून, त्यापैकी ९ के.एल. रुग्णांनी वापरले होते. ३१ के.एल. ऑक्सिजन शिल्लक असल्याची माहिती प्रशासनाकडून देण्यात आली.
असा आहे ऑक्सिजन साठा :
येथील जिल्हा रुग्णालय व आय.टी.आय. हॉस्पिटल या ठिकाणी प्रत्येकी २० के.एल. क्षमतेचे तर जिल्हा परिषदेच्या कोविड रुग्णालय परिसरात १० के.एल.चा लिक्विड ऑक्सिजन टँक उभारले आहेत. याशिवाय उपलब्ध असलेल्या जम्बो सिलिंडरमध्ये १४ लाख २८ हजार लीटर ऑक्सिजन साठवण्याची क्षमता आहे.
रुग्णांना ऑक्सिजन पुरविणारी यंत्रणा :
यंत्र प्रति मिनिट ऑक्सिजन देण्याची क्षमता
नोझल प्राँग : २ ते ६ लीटर,
सिंपल मास्क : ६ ते १० लीटर, मास्क उईथ रिझर्व्हायर : ६ ते १५ लीटर,
बाय-पॅप मास्क : ५ ते १५ लीटर,
नॉन इन्व्हॅस व्हेंटिलेशन (एनआयव्ही) : ३० लीटर, ऑक्सिजन कॉन्स्ट्रेटर : ५ लीटर.