परभणी : कोरोनाचा संसर्ग घटला असून, सध्या केवळ ७८ रुग्णांवर उपचार केले जात असल्याची माहिती आरोग्य विभागाने दिली.
मागील आठवड्यात आरटीपीसीआर चाचण्यांची संख्या वाढविण्यात आली आहे. मोठ्या प्रमाणात चाचण्या होत असल्या तरी पॉझिटिव्ह रुग्णांचे प्रमाण कमीच आहे. त्यामुळे नागरिकांना दिलासा मिळाला आहे. मंगळवारी आरोग्य विभागाला १०७ नागरिकांचे अहवाल प्राप्त झाले. त्यात १०१ जणांचे अहवाल निगेटिव्ह आणि ६ जणांचे अहवाल पॉझिटिव्ह प्राप्त झाले आहेत. दिवसभरात १४ रुग्ण कोरोनामुक्त झाले आहेत. जिल्ह्यात आता एकूण ७ हजार ६४६ रुग्णांची नोंद झाली आहे. त्यापैकी ७ हजार २६२ रुग्णांनी कोरोनावर मात केली आहे. ३०६ रुग्णांचा कोरोनाने मृत्यू झाला असून, ७८ रुग्ण उपचार घेत आहेत.
दिवसभरात आढळलेल्या रुग्णांमध्ये परभणी तालुक्यातील पिंपळगाव येथील ६० वर्षीय पुरुष, सोनपेठ शहरातील सारडानगर येथील ५३ वर्षीय महिला, परभणी शहरातील नागराज मंदिर भागातील ५० वर्षीय पुरुष, नवा मोंढा भागातील ५३ वर्षीय पुरुष, गव्हाणे रोड भागातील १८ वर्षांचा युवक आणि जिंतूर शहरातील ७० वर्षीय वृद्धा या सहा जणांना कोरोना झाल्याचे आरोग्य विभागाने स्पष्ट केले.
दिवसभरात घेतले ३ हजार स्वॅब
जिल्ह्यात आरटीपीसीआर चाचण्या वाढविण्यात आल्या असून, ग्रामीण भागातही आता या चाचण्या केल्या जात आहेत. मंगळवारी ३ हजार ३६७ नागरिकांचे स्वॅब अहवाल प्राप्त झाले आहेत. त्यातील ८२४ जणांचे स्वॅब नमुने जिल्हा स्तरावर घेण्यात आले आहेत. या सर्व स्वॅब नमुन्यांचा अहवाल प्रयोगशाळेकडे प्रलंबित आहे.