परभणी जिल्ह्यात फेब्रुवारी महिन्यापासून कोरोना विषाणूच्या दुसऱ्या टप्प्यात सुरुवात झाली. दिवसेंदिवस रुग्णांची संख्या वाढत गेल्याने कोरोना रुग्णांची संख्या आटोक्यात आणण्यासाठी जिल्हा प्रशासनाने लॉकडाऊन जाहीर केले. परिणामी मार्च महिन्याच्या शेवटच्या आठवड्यापासून जिल्ह्यात बस सेवा बंद झाली. दरदिवशी ३२ लाख ६८ हजार रुपयांचे मिळणारे उत्पन्न ठप्प झाले. त्याचबरोबर कर्मचाऱ्यांच्या पगाराचा प्रश्नही ऐरणीवर आला. जून महिन्याच्या पहिल्या आठवड्यापासून कोरोना रुग्णांची संख्या घटल्याने जिल्हा प्रशासनाने सात जूनपासून जिल्हाअंतर्गत बस सेवा सुरू करण्यास परवानगी दिली. त्यानुसार परभणी आगारातील सोळा, जिंतूर आगारातील १३, पाथरी आगारातील १९, तर गंगाखेड आगारातून २० बस फेऱ्या सुरू करण्यात आल्या आहेत. यासाठी चालक व वाहक असे एकूण १३६ कर्मचारी कार्यरत आहेत. मात्र, जिल्ह्यात पहिल्याच दिवशी जिल्ह्यातील या चारही आगारातील बस सेवेला प्रवाशांचा अपेक्षित प्रतिसाद मिळाला नाही. त्याचबरोबर मरणाची भीती कायम असल्याने चालक व वाहकांकडून प्रवाशांना सॅनिटायझर घेतले आहे का, मास्क आहे का, यासह अनेक प्रशासक प्रश्नांचा भडिमार केला जात असल्याचे सोमवारी परभणी आगारात केलेल्या पाहणीतून दिसून आले.
ना मास्क, ना सॅनिटायझर
कोरोनाचे संकट तीव्र झाले असताना अनेक प्रवासी मास्क आणि सॅनिटायझरचा वापर करताना सोमवारी परभणी बस स्थानकात दिसून आले नाहीत. त्यामुळे या प्रवाशांना एसटी बसमधून प्रवास करण्यास चालक व वाहकांकडून मनाई केली जात आहे. परिणामी, बहुतांश वेळी प्रवासी आणि चालक - वाहकांत वादाचे प्रसंग सोमवारी उद्भवले.