परभणी : कोरोनाचा संसर्ग कमी झाल्याने बाजारपेठेतील व्यवहार सुरू झाले असून, अनलॉकच्या पहिल्याच दिवशी नागरिकांनी नियम डावलत बाजारपेठेत मोठी गर्दी केली. त्यामुळे तब्बल तीन ते चार तास या भागातील वाहतूक ठप्प राहिली.
जिल्ह्यात कोरोनाचा संसर्ग घटला आहे. राज्य शासनाच्या अनलॉकच्या प्रक्रियेत परभणी जिल्ह्याचा समावेश तिसऱ्या टप्प्यात असल्याने सोमवार ते शुक्रवारपर्यंत बाजारपेठेतील सर्व व्यवहार सायंकाळी चार वाजेपर्यंत खुले ठेवण्याची परवानगी मिळाली आहे. या निर्णयामुळे नागरिकांसह व्यापाऱ्यांमध्ये समाधानाचे वातावरण आहे. संपूर्ण बाजारपेठ खुली झाल्याने नागरिकांमध्ये उत्साहाचे वातावरण आहे. अनलॉकच्या पहिल्याच दिवशी येथील बाजारपेठेत सकाळी दहा वाजेपासून नागरिकांनी खरेदीसाठी तोबा गर्दी केली. किराणा, कापड, इलेक्ट्रॉनिक्स, कृषी इतर दुकाने दुकानांवर ग्राहकांची संख्या मोठ्या प्रमाणात दिसून आली. या काळात फिजिकल डिस्टन्स, मास्कचा वापर या कोरोना प्रतिबंधक नियमांचे सर्रास उल्लंघन झाले. शहरातील शिवाजी चौक, गांधी पार्क जनता मार्केट, कच्छी बाजार, नानलपेठ या परिसरातील रस्त्यांवर मोठी गर्दी झाली होती.
सायंकाळी चार वाजेपर्यंत बाजारपेठ ग्राहकांनी फुलून गेली होती. एकीकडे हा उत्साह समाधान देणारा असला तरी दुसरीकडे कोरोनाचा संसर्ग अद्याप संपलेला नाही. बाजारपेठ सुरू झाली असली तरी प्रतिबंधक नियमांचे पालन करायचे आहे, ही बाब विस्मरणात गेली की काय? असे चित्र निर्माण झाले होते. एवढ्या मोठ्या संख्येने गर्दी केली तर कोरोना संसर्ग कमी होणार कसा? असा सवाल यानिमित्ताने उपस्थित होत आहे.
जागोजागी वाहतूक ठप्प
अनलॉक झाल्याने बाजारपेठेतील व्यवहार खुले झाले असले तरी ग्राहकांच्या गर्दीमुळे रस्ते मात्र लॉक झाल्याचे चित्र सोमवारी पहावयास मिळाले. शहरातील जनता मार्केट, कच्छी बाजार या भागात एकेरी वाहतुकीचे मार्ग आहेत. या रस्त्यावर वाहनांची एकच गर्दी झाल्याने तब्बल तीन तासांपर्यंत वाहतूक ठप्प झाली होती. अशीच परिस्थिती गांधी पार्क, नारायणचाळ रोड, स्टेशन रोड, नवा मोंढा, ग्रँड कॉर्नर या भागातही निर्माण झाली. एकाच वेळी रस्त्यावर मोठ्या संख्येने वाहने आल्याने वाहतूक ठप्प झाली होती. ही वाहतूक सुरळीत करताना पोलीस कर्मचाऱ्यांना मात्र तारेवरची कसरत करावी लागली.
मनपाकडून कारवाई
कोरोनाच्या प्रतिबंधक नियमांची अंमलबजावणी करण्यासाठी महानगरपालिका प्रशासनाने पथकांची स्थापना केली आहे. रविवारपर्यंत या पथकाने शहरात ठिकठिकाणी कारवाई केली. सोमवारी सर्व व्यवहार खुले झाल्यानंतर होणारी गर्दी लक्षात घेता प्रतिबंधात्मक कारवाई कडक स्वरूपात होणे आवश्यक होते ; परंतु सोमवारी या पथकांकडून कुठेही कारवाई झाली नाही.