शहरातील वकील कॉलनी परिसरात असलेले गौतमी सुपर शॉपी दुकान बंद करून दुचाकीवरून घराकडे निघालेल्या कुणाल अनिल यानपल्लेवार या व्यापाऱ्याच्या कानशिलात मारून ते दुचाकीवरून खाली पडले. तेव्हा त्यांच्या हातातील रोख रक्कम असलेली बॅग अज्ञात चोरट्यांनी पळविल्याची घटना २ फेब्रुवारी रोजी रात्री ९.३० वाजताच्या सुमारास घडली होती. याप्रकरणी गंगाखेड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाल्यानंतर याचा तपास करण्यासाठी स्थापन करण्यात आलेल्या गंगाखेड पोलीस ठाणे व स्थानिक गुन्हे शाखेच्या वेगवेगळ्या पथकांनी गुन्ह्यातील आरोपी निष्पन्न करीत ५ फेब्रुवारी रोजी अर्जुन नागनाथ बडवणे, किशोर ऊर्फ मुन्ना विठ्ठलराव भोसले व साहिल सुंदरराव ऊर्फ राजेश जाधव तिघे रा. खडकपुरा, गंगाखेड या तिन्ही आरोपींना पुणे येथून अटक करून त्यांच्या जवळून एक बंदूक, गुन्ह्यात वापरलेली स्कुटी, रोख १,०३,४०० रुपये, मोबाइल असा एकूण २,०८,४०० रुपयांचा मुद्देमाल ताब्यात घेतला. अटकेतील तिन्ही आरोपींना ६ फेब्रुवारी रोजी गंगाखेड येथील प्रथम श्रेणी न्यायालयासमोर हजर केले असता न्यायालयाने त्यांना एका दिवसाची पोलीस कोठडी सुनावली आहे. याचा पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक विठ्ठल घोगरे करीत आहेत.
व्यापाऱ्याची बॅग पळविणाऱ्या तिघांना एक दिवसाची पोलीस कोठडी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 7, 2021 04:16 IST