कोरोना संसर्ग रोखण्यासाठी लसीकरण वाढविणे आवश्यक आहे. जिल्ह्यात कोरोनाच्या रुग्णांची संख्या वाढू लागली आहे. विशेष म्हणजे, या रुग्णांमध्ये सर्व वयोगटातील रुग्णांचा समावेश आहे. जिल्ह्यात आतापर्यंत २५ हजार ९९९ रुग्णांना कोरोनाची बाधा झाली आहे. त्यापैकी १६ वर्षांखालील २ हजार ७२६ रुग्णांचा समावेश आहे. एकूण रुग्णांच्या तुलनेत १० टक्के रुग्ण १६ वर्षांखालील असताना प्रशासनाने या रुग्णांसाठी लस उपलब्ध केली नाही. त्यामुळे प्रतिबंधात्मक उपाययोजना ठप्प आहेत. तर दुसरीकडे ४० वर्षांपर्यंत १३ हजार २८१ रुग्णांची आतापर्यंत नोंद झाली आहे. या रुग्णांसाठीही लस उपलब्ध नाही. त्यामुळे एकीकडे रुग्णसंख्या वाढत असताना लसीकरणाला मात्र अडथळे निर्माण होत आहेत. सध्या ४५ वर्षांपुढील नागरिकांना लसीकरण करण्याचे उद्दिष्ट निश्चित करण्यात आले आहे; परंतु मागच्या काही दिवसांपासून लसीचा तुटवडा जाणवत आहे. वयोगटात बसत असतानाही लस मिळत नसल्याची स्थिती निर्माण झाली आहे. कोरोनाचा संसर्ग रोखण्यासाठी आता लसीकरण वाढविण्याची गरज निर्माण झाली आहे.
लसीकरणात वयोगटाचा अडथळा
जिल्ह्यात आतापर्यंत १६ वर्षांखालील २ हजार ७२६ मुलांना कोरोनाची लागण झाली आहे. कोरोनापासून सुरक्षित होण्यासाठी या मुलांना लसीकरण करणे आवश्यक आहे. मात्र शासनाच्या नियमांचा अडथळा निर्माण होत आहे. या मुलांसाठी लसीकरणात वयाचा अडथळा येत आहे.
४५ पेक्षा कमी वयाचे १३ हजार रुग्ण
जिल्ह्यात आतापर्यंत ४५ वर्षांपेक्षा कमी वय असलेल्या १३ हजार २८१ जणांना कोरोना झाला आहे. मात्र या नागरिकांना सध्या तरी लस उपलब्ध नाही.
१८ वर्षांपुढील सर्व नागरिकांना लस देण्याचा निर्णय राज्य शासनाने दोन दिवसांपूर्वी घेतला आहे. १ मेपासून या लसीकरणास प्रारंभ होईल. त्यामुळे या नागरिकांना मदत मिळविण्यासाठी आणखी दहा दिवसांची प्रतीक्षा करावी लागणार आहे.
मुलांनी विनाकारण घराबाहेर पडू नये
१६ वर्षांपेक्षा कमी वयाच्या मुलांना अद्याप लस उपलब्ध झाली नाही. त्यामुळे कोरोनाचा संसर्ग मुलांपर्यंत पोहोचू नये याची काळजी स्वतः मुलांसह पालकांनी घेतली पाहिजे. विनाकारण घराबाहेर पडण्याचे मुलांनी टाळावे, मास्क आणि सॅनिटायझरचा वापर करावा, असे आवाहन वैद्यकीय तज्ज्ञांनी केले आहे.