शेतकऱ्यांच्या सात-बारा, होल्डिंग आणि इतर कामांना गती मिळावी, या उद्देशाने राज्य शासनाने सर्व तलाठ्यांना लॅपटॉप उपलब्ध करून देत ऑनलाईन कामे करण्याचे प्रशिक्षण दिले आहे. मागील दोन वर्षांपासून जिल्ह्यात ऑनलाईन पद्धतीने सात-बारा दिला जात आहे.
जिल्ह्यात एकूण २३९ तलाठी आणि ३९ मंडलाधिकारी कार्यरत आहेत. तलाठी आणि मंडलाधिकाऱ्यांच्या माध्यमातून गावपातळीवरील कामे केली जातात. अनेकवेळा शेतकऱ्यांना तलाठी सज्जावर जाऊन सात-बारा घ्यावा लागतो. शेतकऱ्यांची होणारी अडचण लक्षात घेऊन तलाठ्यांना लॅपटॉप देऊन त्या ठिकाणाहून सात-बारा व इतर कामे करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. त्यानुसार जिल्ह्यात दोन वर्षांपूर्वी २२५ तलाठ्यांना लॅपटॉप वाटप करण्यात आले आहेत. त्याचप्रमाणे ३९ मंडल अधिकाऱ्यांनाही लॅपटॉप देण्यात आले आहेत. जिल्ह्यासाठी २७७ लॅपटॉप प्राप्त झाले होते. ते सर्व वितरित केले असल्याची माहिती प्रशासनाने दिली.
नवनियुक्त तलाठी वंचित
गेल्या दोन वर्षांत १४ तलाठ्यांची नव्याने नियुक्ती करण्यात आली आहे. या तलाठ्यांना मात्र लॅपटॉप उपलब्ध नाही. जिल्हा प्रशासनानेही त्यांच्यासाठी अद्यापपर्यंत मागणी नोंदविलेली नाही. त्यामुळे या तलाठ्यांना लॅपटॉप उपलब्ध करून देण्यासाठी प्रशासनाकडून प्रयत्नांची गरज निर्माण झाली आहे.