परभणी : जिल्ह्यातील कोरोना लसींचा साठा संपला असून, शनिवारी लसींअभावी सर्व केंद्रे बंद ठेवावी लागली. नागरिक लसीकरणासाठी पुढे येत असून, शनिवारी सकाळी केंद्रासमोर नागरिकांची मोठी रांग लागली होती. अखेर लस नसल्याचे जाहीर केल्यानंतर या नागरिकांना रिकाम्या हाताने परतावे लागले.
कोरोनापासून स्वतःला सुरक्षित ठेवण्यासाठी आता नागरिक स्वतः लसीकरणासाठी पुढे येत आहेत. परंतु, जिल्ह्यात मागच्या अनेक दिवसांपासून लसींचा तुटवडा निर्माण झाल्याने लस मिळविण्यासाठी शहरातील प्रत्येक केंद्रावर नागरिक चकरा मारत आहेत. सध्या ४५ वर्षांपुढील नागरिकांना लस दिली जात आहे. परंतु, या नागरिकांसाठी जिल्ह्यात लस उपलब्ध नाही. शासनाने १ मेपासून अठरा वर्षांपुढील सर्व नागरिकांना लसीकरण करण्याचे जाहीर केले आहे. त्यामुळे १८ वर्षांपुढील नागरिकांना लस द्यायची कशी, असा प्रश्न प्रशासनासमोर निर्माण झाला आहे. जिल्ह्यात सध्यातरी लसींचा खडखडाट आहे. शनिवारी लस संपल्याने अनेक केंद्रांवर लस नसल्याचे फलक लावण्यात आले. विशेष म्हणजे, सकाळपासूनच नागरिकांनी या केंद्रांवर रांग लावली होती. परंतु, उशिराने केंद्रावरील अधिकाऱ्यांनी लस नसल्याचे जाहीर केले. त्यामुळे नागरिकांना परतावे लागले.
१२ लाख डोसेसची गरज
जिल्ह्यात सद्यस्थितीला लसींचा साठा संपला आहे. १ मेपासून १८ वर्षांपुढील नागरिकांना लसीकरण केले जाणार आहे. जिल्ह्यात १८ वर्षांपुढील सुमारे १२ लाख नागरिक आहेत. त्यामुळे या नागरिकांना लसीकरण करण्यासाठी किमान १२ लाख डोसेस जिल्ह्याला लागणार आहेत. प्रत्यक्षात ५ ते ६ हजार डोसेस एवढाच लसींचा पुरवठा होत आहे. त्यामुळे लसींअभावी गोंधळाची स्थिती निर्माण होण्याची शक्यता लक्षात घेता, प्रशासनाने नियोजन करण्याची गरज निर्माण झाली आहे.
आतापर्यंत १ लाख ४० हजार नागरिकांनाच लाभ
राज्यस्तरावरून लसींचा वेळेत आणि मुबलक प्रमाणात पुरवठा होत नसल्याने लसीकरणात अडथळे निर्माण होत आहेत. जिल्ह्यात आतापर्यंत केवळ १ लाख ४० हजार नागरिकांनाच लसीकरण झाले आहे. ८९ हजार ७५५ नागरिकांनी पहिला डोस घेतला असून, दुसरा डोस घेणाऱ्या नागरिकांची संख्या केवळ ७ हजार ४० एवढीच आहे. त्यामुळे लसीकरणाचा वेग वाढविण्यासाठी मोठ्या प्रमाणात लसींचा पुरवठा करावा लागणार आहे.
खासगी दवाखान्यांना स्वतः खरेदी करावी लागणार लस
जिल्ह्यातील ४ खासगी दवाखान्यांमध्ये सध्या लसीकरणाची सुविधा उपलब्ध आहे. जिल्हा प्रशासनाकडून या दवाखान्यांना ठरावीक किमतीमध्ये लस उपलब्ध करून दिली जात होती. मात्र, राज्यस्तरावरील बदललेल्या धोरणांमुळे आता खासगी दवाखान्यांना स्वतःहून कंपनीमार्फत लस खरेदी करावी लागणार आहे. जिल्हा प्रशासनाकडून लस मिळणार नसल्याचेही आरोग्य विभागाकडून सांगण्यात आले.
रविवारीही बंद राहणार केंद्र
कोरोना लसींचा तुटवडा निर्माण झाल्याने शनिवारी दिवसभरात एकाही केंद्रावर लसीकरण झाले नाही. रविवारी सायंकाळपर्यंत लस उपलब्ध होईल, अशी शक्यता आहे. त्यामुळे रविवारी दिवसभर लसीकरण बंद राहणार आहे. सोमवारपासून मात्र या लसीकरणाला प्रारंभ होईल, असे आरोग्य विभागाने स्पष्ट केले.