परभणी शहरातील दर्गा रोडवरील कौडगाव परिसरात चष्मे आब ए हयात ही विहीर १९२० मध्ये बांधण्यात आली होती. १२० फूट व्यास व ८० फूट खोल असलेल्या विहिरीतून एके काळी संपूर्ण परभणी शहराला पाणीपुरवठा करण्यात येत होता. या विहिरीचे पाणी पिण्यायोग्य नसल्याच्या कारणावरून गेल्या काही वर्षांपासून येथील पाण्याचा वापर मनपाकडून बंद करण्यात आला आहे. असे असले तरी शहरातील पाणी पुरवठ्यासाठी येथून मोठ्या प्रमाणात लोखंडी पाईप टाकण्यात आले होते. मार्च २०२१ पर्यंत यासाठीची पाईपलाईन व्यवस्थित होती. त्यानंतरच्या काळात काही अज्ञात व्यक्तींनी खोदकाम करून पाईपलाईनचे पाईप काढून नेल्याची बाब चार दिवसांपूर्वीसमोर आली. यासंदर्भातील माहिती महापौर अनिता सोनकांबळे यांना मिळल्यानंतर त्यांनी या विभागातील अधिकाऱ्यांना बोलावून याबाबत विचारणा केली. कर्मचाऱ्यांनी याबाबत माहिती नसल्याचे सांगितल्यानंतर याप्रकरणी चौकशी करून पोलिसांत गुन्हा दाखल करण्याचे त्यांनी निर्देश दिले आहेत. अद्याप याप्रकरणी पोलिसांत गुन्हा दाखल करण्यात आलेला नाही.
दरम्यान, महानगरपालिकेच्या साहित्याची परस्पर विक्री करण्याचा हा प्रकार नवा नाही. यापूर्वीही अशा अनेक घटना समोर आल्या आहेत ; परंतु मनपाने याबाबत कधीही कठोर भूमिका घेतली नाही. मनपातील झारीतील शुक्राचार्यांकडूनच असे प्रकार झाल्याचे आत्तापर्यंत समोर आले आहे. त्यामुळेच मनपा कचखावू भूमिका घेत असल्याची चर्चा आहे. आता याप्रकरणात तरी मनपा कठोर भूमिका घेते की नाही, याकडे शहरवासीयांचे लक्ष लागले आहे.