परभणी : शहरासह ग्रामीण भागात कोरोना रुग्णांची संख्या वाढल्याने तालुक्यातील झरी आणि पिंगळी येथील प्राथमिक आरोग्य केंद्रांमध्ये कोरोना केअर सेंटर कार्यान्वित केले जाणार असल्याची माहिती आमदार डॉ. राहुल पाटील यांनी दिली.
ग्रामीण भागात कोरोना रुग्णांवर उपचार केले जाणार आहेत. त्यामुळे शहरातील रुग्णालयांवर येणारा भार कमी होणार आहे. या दृष्टीने झरी व पिंगळी येथे कोरोना केअर सेंटर सुरू केले जात आहे. आमदार डॉ. राहुल पाटील यांनी १८ एप्रिल रोजी येथे कोरोना केअर सेंटरसाठी जागेची पाहणी केली. यावेळी त्यांच्यासमवेत शिवसेनेचे सहसंपर्कप्रमुख डॉ. विवेक नावंदर, उपजिल्हाप्रमुख संजय गाडगे, तहसीलदार संजय बिराजदार, गजानन देशमुख, दिनेश बोबडे, दीपक देशमुख, अरविंद देशमुख, आदी उपस्थित होते. ग्रामीण भागात रुग्णसंख्या वाढत असल्याने पिंगळी आणि झरी येथे कोरोना केअर सेंटर कार्यान्वित करावे, अशी मागणी आमदार डॉ. राहुल पाटील यांनी राज्य शासनाकडे केली होती. त्याला मंजुरी मिळाली असून, लवकरच हे केंद्र सुरू होणार असल्याचे आमदार डॉ. राहुल पाटील यांनी सांगितले.