परभणी शहरात सुरू असलेला पाणीपुरवठा सुरळीत करण्यासाठी प्रयत्न केले जात आहेत. त्याचाच एक भाग म्हणून पाणीपुरवठा केंद्रांवर दरमहा येणारे विजेचे बिल कमी करण्यासाठी व त्यात बचत व्हावी या उद्देशाने महाऊर्जा विभागाच्या वतीने सौरऊर्जा प्रकल्प हाती घेण्यात आला आहे. परभणी शहराला येलदरी, धर्मापुरी, रहाटी व कारेगाव येथील जलशुद्धीकरण केंद्रावरून पाणीपुरवठा केला जातो. या चारही ठिकाणी सौर ऊर्जा प्रकल्प कार्यान्वित केले जाणार आहेत.
धर्मापुरीचे काम अंतिम टप्प्यात
अमृत योजनेंतर्गत हे काम हाती घेण्यात आले आहे. सध्या धर्मापुरी जलशुद्धीकरण केंद्र येथे इन्स्टॉलेशन प्रक्रिया सुरू आहे. २.१ मेगावॅट वीजनिर्मिती सौर ऊर्जेद्वारे केली जाणार आहे. धर्मापुरी येथील प्रकल्प पूर्ण झाल्यानंतर उर्वरित रहाटी, कारेगाव आणि येलदरी येथे हे काम हाती घेण्यात येणार आहे. सहा महिन्यांपासून सुरू असलेल्या कामाचा पहिला टप्पा लवकरच पूर्ण होणार आहे.
साडेनऊ कोटींचा खर्च
महाऊर्जा विभाग प्रकल्प पूर्ण करणार असली तरी त्यास लागणारी जागा आणि निधी महापालिकेने दिला आहे. यासाठी जवळपास साडेनऊ कोटींचा खर्च अपेक्षित आहे. अमृत योजनेंतर्गत व महापालिकेच्या निधीतून हे काम पूर्ण होणार आहे. दर महिन्याला साठ लाख रुपयांचे वीज बिल महापालिकेला पाणीपुरवठा वितरणासाठी लागणाऱ्या वीज वापरातून येते. सौर ऊर्जेचा वापर केल्यास ५० टक्के युनिट्सचा वापर कमी होणार आहे. त्यामुळे वीज बचत होण्यास मदत होणार आहे.