परभणी : गृह अलगीकरणात आहात आणि रक्तातील ऑक्सिजन कमी झालेय? काळजी करु नका. यावर घरगुती आणि सोपा उपाय आहे. दिवसभरात काहीवेळासाठी पालथे झोपा, त्यातून रक्तातील ऑक्सिजनची पातळी वाढण्यास मदत होऊ शकते, असा सल्ला वैद्यकीय तज्ज्ञांनी दिला आहे.
सध्या कोरोनाबाधित रुग्णांना ऑक्सिजनची गरज भासत आहे. यासाठी रुग्णांना वेगवेगळे उपाय सांगितले जात आहेत. यामध्ये आरोग्य व कुटुंबकल्याण मंत्रालयाने कोरोनाग्रस्त रुग्णांना विशेषत: गृह अलगीकरणात असलेल्या रुग्णांना पालथे झोपण्याचा सल्ला दिला आहे. या रुग्णांनी पालथे झोपल्यास त्यांच्या रक्तातील प्राणवायूचे प्रमाण वाढते. श्वास घ्यायला काही त्रास होत असेल तर तोही काही प्रमाणात कमी होतो. पाठ बेडवर टेकवून उताणे झोपलेल्या रुग्णाला हळूवारपणे पोटावर झोपवल्याने रक्तातील ऑक्सिजन वाढण्यास मदत होते. सध्या गृह अलगीकरणात ६,३३० रूग्ण आहेत. त्यामुळे या रुग्णांना पालथे झोपण्याचा फायदा होऊ शकतो.
गरोदर स्त्रियांनी पालथे झोपू नये
गरोदर स्त्रियांनी गृह अलगीकरणात असल्यानंतर काळजी घेणे आवश्यक आहे. यामध्ये या महिलांनी पालथे झोपू नये. केवळ बसलेल्या स्थितीत टेबलवर मान टेकवावी, हात एकमेकांवर ठेवावेत, त्यांनी एका अंगावर किंवा पाठीवर झोपावे. तसेच बसलेल्या स्थितीत दीर्घश्वसन करावे.
असा वाढवा रक्तातील ऑक्सिजन
गृह अलगीकरणात असलेल्या रुग्णाने १५ ते २० मिनिटे प्राणायाम करावा, त्यातून फुफ्फुसाची कार्यक्षमता वाढते. पालथे झोपल्याने फुफ्फुसाच्या विस्ताराला जागा मिळते. आरोग्यदायी दिनचर्येचा अवलंब करावा, नाडीशोधन, प्राणायाम करावा. दीर्घ श्वास घेऊन तो सावकाश सोडण्याचा प्रयत्न करावा.
जिल्ह्यातील एकूण रूग्ण - ४००१७
रूग्णालयात सध्या उपचार घेत असलेले रूग्ण - ७८९३
गृह अलगीकरणातील रूग्ण - ६३३०
श्वसनसंस्थेचे कार्य चांगले ठेवावे, मन शांत व प्रसन्न ठेवावे. हलका व पोषक आहार घ्यावा जेणेकरुन पचनसंस्था चांगली राहते. पालथे झोपताना अदवासन, मकरासन, भूजंगासन, शंशाकासन, पर्वतासन, गोमुखासन या आसनांचा वापर करावा.
- डाॅ. दीपक करजगीकर, आयुर्वेदिक तज्ज्ञ.
सरळ झोपल्यानंतर आपल्या हृदयाचा आणि काही प्रमाणात यकृताचा दाब फुफ्फुसावर पडतो. परंतु, पालथे झोपल्यानंतर फुफ्फुसावर दाब पडत नाही. त्यामुळे कमी लक्षणे असलेल्या रुग्णांसाठी प्राणवायूचे प्रमाण वाढविण्यासाठी पालथे झोपण्याचा फायदा होतो.
- डाॅ. अनिल रामपूरकर, आयुर्वेदिक तज्ज्ञ.