परभणी : कोरोनाच्या लसीसाठी जिल्ह्यातील साडेसात हजार अधिकारी- कर्मचाऱ्यांनी राज्य शासनाच्या पोर्टलवर नोंदणी केली आहे. या लसीपासून काही साइड इफेक्ट तर होणार नाहीत ना, या विषयी काही जणांची द्विधा मन:स्थिती असल्याची बाबत समोर येत आहे. तर दुसरीकडे ही लस पूर्णत: सुरक्षित असल्याचे पटवून दिले जात आहे.
कोरोना या महाभयंकर साथीने जिल्ह्यावासीयांना वेठीस धरले होते. एप्रिल ते ऑक्टोबर या सात महिन्यांत जिल्ह्यात ७ हजारांपेक्षा अधिक कोरोना रुग्णांची नोंद झाली. यातील बहुतांश रुग्ण कोरोनामुक्त झाले. या साथीच्या आजारावर मात करणारी लस तयार झाली असून, दोन दिवसांपूर्वीच भारत बायोटेक आणि सीरम इन्स्टिट्यूटच्या लसींचा आपतकालीन स्थितीत वापर करण्यास परवानगी देण्यात आली आहे. कोरोना प्रतिबंधक लस सर्वप्रथम आरोग्य क्षेत्रातील कर्मचाऱ्यांना दिली जाणार असून, त्याची तयारी प्रशासनाने केली आहे. शासकीय आणि खाजगी आरोग्य विभागातील वैद्यकीय अधिकारी, परिचारिका, वॉर्ड बाय आणि इतर कर्मचाऱ्यांची त्यासाठी नोंदणी करण्यात आली आहे. जिल्ह्यात आतापर्यंत ७ हजार ६२३ आरोग्य कर्मचाऱ्यांची नोंदणी झाली आहे. लस साठवणे, ती कशी द्यायची, याविषयी प्रशासन तयारी करीत आहे. मात्र, असे असताना काही जणांच्या मनात या लसीविषयी संभ्रमावस्था आहे. कमी कालावधीत विकसित झालेली ही लस सुरक्षित आहे का, लसीच्या पुरेशा प्रमाणात चाचण्या झाल्या का? कोरोना झाला नसताना किंवा कोरोना होऊन पूर्णत: बरे झालेल्यांनाही ही लस घ्यावी लागेल का?
लस घेतल्यानंतर काही साइड इफेक्ट तर होणार नाहीत ना? असे प्रश्न आरोग्य विभागातील कर्मचाऱ्यांच्या मनात आहेत. या शंकांचे निरसन करण्याचे काम आरोग्य विभागातून केले जात असून, लस पूर्णत: सुरक्षित असून, प्रत्येकाने लस घेण्याचे आवाहन केले जात आहे.
जिल्हा प्रशासनाच्या निर्देशानुसार आयएमएने पुढाकार घेऊन कोरोनाची लस घेण्यासाठी शहरी भागात सर्व खाजगी डॉक्टर्स आणि त्यांच्या दवाखान्यातील कर्मचाऱ्यांची नोंदणी केली आहे. नोंदणीचे काम जवळपास पूर्ण झाले आहे.
-डॉ. अनिल कान्हे, अध्यक्ष, आयएमए
कोरोना लसीसाठी जिल्ह्यात कोल्ड चैन तयार करण्याचे नियोजन केले जात आहे. प्रत्येक तालुकास्तरावर लस देण्यासाठीचे नियोजन करण्यात आले आहे. प्रशासकीय पातळीवर सर्व यंत्रणा तयार ठेवली आहे.
-डॉ. किशोर सुरवसे, निवासी वैद्यकीय अधिकारी.
नोंदणी केलेले अधिकारी-कर्मचारी वैद्यकीय अधिकारी : ८३६
क्षेत्रीय आरोग्य कर्मचारी : ४४४९
परिचारिका, पर्यवेक्षक : ५७८
पॅरा मेडिकल स्टाफ : ३१९
सहायकारी कर्मचारी : ४९७
प्रशासकीय कर्मचारी : ३६६