परभणी : प्लेगग्रस्त रूग्णांसाठी आपल्या जिवाची पर्वा न करता धाडसी बाणा दाखवत सावित्रीबाई फुले यांनी केलेले सेवाकार्य अतुलनीय असून, इतरांसाठी प्रेरणादायी आहे, असे प्रतिपादन डाॅ. पंजाबराव देशमुख राष्ट्रीय शिक्षक परिषदेचे जिल्हाध्यक्ष गजानन सोळंके यांनी केले.
वसमत रस्त्यावरील कारेगावकर संकुलात सावित्रीबाई फुले जयंती साजरी करण्यात आली याप्रसंगी सोळंके बोलत होते. प्रारंभी सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले. याप्रसंगी नगरसेवक सचिन देशमुख, पंजाबराव देशमुख राष्ट्रीय शिक्षक परिषदेचे तालुकाध्यक्ष रवी लोहट, चंद्रकांत शहाणे यांची प्रमुख उपस्थिती होती.
अध्यक्षीय समाराेपात नगरसेवक सचिन देशमुख म्हणाले, महात्मा फुले यांनी त्यांच्या कार्याला ऊर्जा देण्याचे प्रमुख श्रेय सावित्रीबाईंना दिले आहे. मी जे काही काम करू शकलो त्यात सावित्रीबाईंचा खूप मोठा वाटा आहे, असे त्यांनी म्हटले आहे. आपणही तो आदर्श घेऊन महिलांना चांगल्या कार्यासाठी सोबत घेऊन प्रोत्साहन दिले पाहिजे. क्षेत्र कुठलेही असो ते कार्य पूर्ण करण्याचा ध्यास घेतला तर महिला त्या नेटाने पार पाडतात, हे सावित्रीबाईंचे कार्य पाहून लक्षात येते. त्यांच्या धाडसी कार्याचा परिचय येणाऱ्या पिढीला करून दिला पाहिजे. रणजित कारेगावकर यांनी सूत्रसंचालन केले. विष्णू मेहेत्रे यांनी प्रास्ताविक केले. बंडू मगर यांनी आभार मानले. यशस्वीतेसाठी प्रसाद ठाकूर, बाळासाहेब शिनगारे, सर्पमित्र अक्षय बिडकर, विशाल कदम, शेख मोहसीन आदींनी प्रयत्न केले.