परभणी : तालुक्यातील ८८ ग्रामपंचायतींच्या सरपंच आणि उपसरपंच निवडीचा कार्यक्रम तहसीलदारांनी जाहीर केला आहे. त्यामुळे पुढील आठवड्यातील तालुक्यातील ग्रामीण भागात राजकीय वातावरण ढवळून निघणार आहे.
जिल्ह्यातील ५६६ ग्रामपंचायतींच्या सार्वत्रिक निवडणुका मागील महिन्यात पार पडल्या. राज्य शासनाच्या निर्णयानुसार यावेळेस प्रथमच ग्रामपंचायत निवडणुकीनंतर सरपंच पदाचे आरक्षण जाहीर करण्यात आले. त्यामुळे अनेक इच्छुक उमेदवारांची गोची झाली आहे. पॅनेलप्रमुखांना तर संभाव्य सरपंच पदाचा उमेदवार गृहीत धरून या निवडणुकीत पॅनेल तयार करावे लागले. शासनाच्या निर्णयानुसार २२ जानेवारी रोजी सरपंच पदाचे आरक्षण सोडतीने जाहीर करण्यात आले. त्यामुळे आता सरपंच पदी कोणाची वर्णी लागणार याविषयी ग्रामीण भागात उत्सुकता होती. त्यामुळे सरपंच आणि उपसरपंच निवडीच्या कार्यक्रमाकडे जिल्हावासीयांचे लक्ष लागले होते. त्यातच मागील रविववारी जिल्हाधिकारी दीपक मुगळीकर यांनी सरपंच - उपसरपंच निवडीचा कार्यक्रम जाहीर केला असून, पीठासन अधिकारी निवडण्याचे अधिकार तहसीलदारांना दिले होते.
या अधिकारानुसार येथील तहसीलदार डॉ. संजय बिरादार यांनी तालुक्यातील ८८ ग्रामपंचायतींसाठी ३० पीठासन अधिकाऱ्यांची नियुक्ती केली आहे. तालुक्यात तीन टप्प्यांत या निवडी होणार आहेत. ८ ते १२ डिसेंबर या काळात ग्रामपंचायतनिहाय निवडीचा कार्यक्रम जाहीर करण्यात आला आहे.
सरपंच, उपसरपंच निवडीचा कार्यक्रम जाहीर झाल्याने पुन्हा एकदा ग्रामीण भागात वातावरण ढवळून निघणार आहे. आतापासून इच्छुक उमेदवारांनी तयारी सुरू केली आहे. सरपंच पदाच्या आरक्षणानुसार त्या त्या प्रवर्गातील ग्रामपंचायत सरपंच पदासाठी ग्रामपंचायत सदस्यांची जुळवणी करण्याची तयारी सुरू केली आहे. त्यामुळे प्रत्यक्ष सरपंच पदी कोणाची वर्णी लागते, याकडे आता तालुक्याचे लक्ष लागले आहे.
अशा होतील निवडी
ग्रामपंचायतींच्या सार्वत्रिक निवडणुकीत विजयी झालेल्या ग्रामपंचायत सदस्यांमधून सरपंच आणि उपसरपंच निवडले जाणार आहेत. त्यासाठी तहसीलदारांनी निश्चित केलेल्या वेळापत्रकानुसार पीठासन अधिकाऱ्यांच्या अध्यक्षतेखाली ग्रामसभा घेतली जाणार असून, त्यात सरपंच, उपसरपंचांची निवड केली जाणार आहे. तालुक्यातील ३० ग्रामपंचायतींची सरपंच - उपसरपंचांची निवड ८ फेब्रुवारी रोजी होणार आहे. त्याचप्रमाणे २९ ग्रामपंचायतींच्या सरपंच- उपसरपंचांची निवड १० फेब्रुवारी रोजी आणि उर्वरित २९ ग्रा.पं.तील सरपंच- उपसरपंचांची निवड १२ फेब्रुवारी रोजी होणार आहे. तालुक्यात झरी, दैठणा, धर्मापुरी, टाकळी बोबडे, वरपूड, लोहगाव या ग्रामपंचायतींच्या सरपंच निवडीकडे लक्ष लागले आहे.
पीठासन अधिकाऱ्यांची आज बैठक
सार्वत्रिक निवडणुका झालेल्या ग्रामपंचायतींमध्ये सरपंच - उपसरपंच निवडीसाठी पीठासन अधिकारी म्हणून नियुक्त केलेल्या अधिकाऱ्यांची बैठक ३ फेब्रुवारी रोजी दुपारी दोन वाजता तहसील कार्यालयात आयोजित केली आहे. या बैठकीत अधिकाऱ्यांना सरपंच- उपसरपंच पदाची निवड कशी करायची? याविषयी प्रशिक्षण दिले जाणार आहे. त्यामुळे या बैठकीस अधिकारी उपस्थित राहणे बंधनकारक आहे. अनुपस्थित अधिकाऱ्यांवर ग्रामपंचायत अधिनियमान्वये कारवाई केली जाईल, असा इशारा तहसीलदार डॉ. संजय बिरादार यांनी दिला आहे.