परभणी : कोणतीही विषेश सेवा न देता दक्षिण मध्य रेल्वे विभागाने फेस्टिवल आणि विशेष रेल्वेच्या नावाखाली प्रवाशांची लूट सुरू केली असून, प्रवाशांच्या खिशाला कात्री लागत आहे. त्यामुळे प्रवाशांची डोकेदुखी कायमच आहे.
कोरोनाचा संसर्ग कमी झाल्यानंतर राज्यात आठ महिन्यानंतर रेल्वे सेवा सुरू करण्यात आली. विशेष म्हणजे, राज्यातील इतर सेवा पूर्वीप्रमाणे सुरळीत सुरू झाल्या असताना रेल्वे प्रशासनाने मात्र केवळ फेस्टिवल, स्पेशल आणि उत्सवच्या नावाखाली रेल्वे गाड्या सुरू केल्याने प्रवाशांना अधिकचे पैसे मोजून रेल्वेने प्रवास करावा लागत आहे. मराठवाड्यातील औरंगाबाद, नांदेड, जालना या जिल्ह्यांमध्ये प्रवास करणाऱ्या प्रवाशांची संख्या अधिक आहे. रेल्वेचा प्रवास कमी पैशांमध्ये
आणि सुरक्षित प्रवास समजला जातो. त्यामुळे बहुतांश प्रवासी रेल्वेला प्राधान्य देतात. परभणीहून औरंगाबाद आणि नांदेड येथे जाणाऱ्या प्रवाशांची संख्या अधिक आहे. पूर्वी रेल्वेने औरंगाबादला जाण्यासाठी केवळ ७५ रुपयांचे प्रवास भाडे आकारले जात होते. मात्र आता औरंगाबादसाठी ११० रुपयांपासून ते ३६५ रुपयांपर्यंतचे भाडे आकारले जात आहे. तर ३० रुपयांचे तिकीट दर असलेल्या नांदेड शहरासाठी ७५ रुपयांपासून ते २५० रुपयांपर्यंतचे पैसे मोजावे लागत आहेत. त्यामुळे विशेष रेल्वेच्या नावाखाली रेल्वे प्रशासनाकडून प्रवाशांची लूट केली जात आहे. सर्वसाधारण तिकीटही महागल्याने प्रवाशांमध्ये संताप व्यक्त केला जात आहे. त्यामुळे रेल्वे गाड्यांचा विशेष दर्जा हटवून पूर्वीप्रमाणे सवारी आणि एक्सप्रेस रेल्वे गाड्या सुरू कराव्यात, अशी प्रवाशांची मागणी आहे.
असा लागतोय खर्च
परभणी ते औरंगाबाद या प्रवासासाठी पूर्वी ७५ रुपये तिकीट दर होते. मात्र आता मराठवाडा एक्सप्रेस या रेल्वेने प्रवास करण्यासाठी सिटिंग साठी ११० रुपये तर इतर रेल्वे गाड्यांमध्ये स्लीपर तिकिटासाठी ३६५ रुपये लागत आहेत.नांदेड- परभणी हा प्रवास केवळ ३० रुपयांमध्ये पूर्वी केला जात होता. मात्र सध्या परभणीहून नांदेड येथे जाण्यासाठी कमीतकमी ७५ रुपये आणि जास्तीत जास्त २५० रुपये दर आकारले जात आहेत.
३०० किमीच्या नियमाचा फटका
रेल्वे विभागाने रेल्वे प्रवासासाठी किमान ३०० किलोमीटर अंतर ग्राह्य धरून त्यानुसार तिकीट दर आकारले आहेत. त्यामुळे ३०० किमी पेक्षा कमी अंतराचा प्रवास करणाऱ्या प्रवाशांनाही ३०० किमीचे प्रवासभाडे मोजावे लागत आहे.