जिल्ह्यात मागील तीन दिवसांपासून बाधित रुग्णांची संख्या घटल्याने नागरिकांना दिलासा मिळाला आहे. दोन आठवड्यांपूर्वी ८०० ते ९०० रुग्ण नव्याने नोंद होत होते. मात्र, ही संख्या आता लक्षणीयरीत्या घटली असून, तीन दिवसांपासून नव्या रुग्णांची संख्या ५०० पेक्षाही कमी होत आहे.
९ मे रोजी आरोग्य विभागाला १ हजार ४३९ नागरिकांचे अहवाल प्राप्त झाले. त्यात आरटीपीसीआरच्या १ हजार २२५ अहवालांमध्ये ३१० आणि रॅपिड अँटिजेनच्या ३१४ अहवालांमध्ये १५२ जणांचे अहवाल पॉझिटिव्ह आहेत.
जिल्ह्यातील बाधित रुग्णांची संख्या घटल्याने नागरिकांना दिलासा मिळाला असला तरी दुसरीकडे कोरोनाने मृत्यू पावणाऱ्या रुग्णांचे प्रमाण मात्र अजूनही घटले नाही. दररोज ८ ते १० रुग्ण कोरोनाने मृत्युमुखी पडत आहेत. रविवारी १२ रुग्णांचा मृत्यू झाला. त्यात जिल्हा रुग्णालयातील ६, आयटीआय हॉस्पिटलमधील ३ आणि खासगी रुग्णालयातील तीन रुग्णांचा समावेश आहे. मृत्यू पावलेल्या रुग्णांमध्ये ११ पुरुष आणि एका महिलेचा समावेश आहे.
जिल्ह्यात एकूण रुग्णसंख्या ४२ हजार ९७० झाली असून, त्यापैकी ३५ हजार ३७३ रुग्ण कोरोनामुक्त झाले आहेत. १ हजार २७ रुग्णांचा आतापर्यंत कोरोनाने मृत्यू झाला. सध्या ६ हजार ५७० रुग्ण उपचार घेत आहेत.
येथील जिल्हा रुग्णालयात २१८, आयटीआय हॉस्पिटलमध्ये १३७, जिल्हा परिषदेच्या कोविड रुग्णालयात २४९, अक्षदा मंगल कार्यालयात १२० आणि रेणुका कोविड हॉस्पिटलमध्ये ७६ रुग्ण उपचार घेत आहेत. त्याचप्रमाणे ५ हजार २६० रुग्णांवर त्यांच्या घरीच उपचार सुरू आहेत.