येलदरी : जिंतूर तालुक्यातील येलदरी आणि परिसरातील गावांमध्ये ९ मे रोजी सकाळी ७.३० वाजण्याच्या सुमारास विजांच्या कडकडाटासह जोरदार अवकाळी पावसाने हजेरी लावली. या पावसामुळे भुईमूग पिकाचे मोठे नुकसान झाले आहे.
जिल्ह्यात अवकाळी पाऊस होईल, असा अंदाज हवामान खात्याने वर्तविला होता. रविवारी सकाळपासून येलदरी परिसरात ढगाळ वातावरण निर्माण झाले. सकाळी ७.३० वाजण्याच्या सुमारास पावसाला प्रारंभ झाला. विजांच्या कडकडाटासह झालेल्या जोरदार पावसामुळे शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले आहे. सध्या उन्हाळी भुईमुगाची काढणी सुरू आहे. बहुतांश मजूर सकाळी शेतामध्येच कामावर गेले होते. अचानक पाऊस आल्याने या मजुरांची धावपळ झाली. काढून ठेवलेले भुईमूग भिजले आहे. मागील तीन ते चार दिवसांपासून ढगाळ वातावरण राहत असून, सायंकाळच्या वेळी तुरळक पाऊस होत आहे. रविवारी मात्र पहाटे मेघगर्जनेसह पाऊस झाल्याने शेतकऱ्यांना मोठे नुकसान सहन करावे लागले.
जिंतूर तालुक्यातील हिवरखेडा, बामणी या परिसरातही पाऊस झाला असून, पिकांचे नुकसान झाल्याचे शेतकऱ्यांनी सांगितले. जिल्ह्यातील इतर भागात मात्र दिवसभर ढगाळ वातावरण होते. मोठा पाऊस झाला नाही.