परभणी : सर्वसामान्य नागरिकांच्या अंधश्रद्धेचा फायदा घेत गुप्तधन शोधून देतो, तसेच पैशाचा पाऊस पाडण्याचे प्रकार जिल्ह्यात मागील काही वर्षांत घडले आहेत. या अंधश्रद्धेचे उच्चाटन करण्यासाठी अंधश्रद्धा निर्मूलन समिती ठिकठिकाणी जागृती करीत आहे.
जिल्ह्यात भोंदुबाबांची कमी नाही. काही ना काही चमत्कार दाखवून सर्वसामान्य नागरिकांच्या अंधश्रद्धेचा फायदा उठविला जातो. सामान्यांच्या प्रश्नांवर हातचालाखीने चमत्कार दाखवून त्यांना आकर्षित करून लूट करण्याचे प्रकार यापूर्वी घडले आहेत. जिंतूर, मानवत, गंगाखेड या भागात यापूर्वी असे प्रकार घडले आहेत. अंधश्रद्धा निर्मूलन समिती गावा-गावात याविषयी जनजागृती करीत आहे. त्यामुळे नागरिकांनीच अंधश्रद्धेला दूर सारले, तर भोंदुबाबांच्या या प्रकाराला अटकाव बसणे शक्य होणार आहे.
२०१३ मध्ये केला कायदा
लोकांच्या अंधश्रद्धेचा फायदा उचलत त्यांची फसवणूक करणाऱ्यांविरुद्ध २६ ऑगस्ट २०१३ पासून अंद्धश्रद्धा निर्मूलन कायदा अमलात आला आहे. या कायद्यांतर्गत भानामती, काळी जादू दाखवून लोकांची फसवणूक होत असेल, तर त्याच्याविरुद्ध पोलीस ठाण्यात तक्रार दाखल करता येते. त्यामुळे असे प्रकार होत असतील, तर तक्रार करण्यास पुढे आले पाहिजे.
गुन्ह्यांचे प्रमाण कमीच
n मागील काही वर्षांत घडलेल्या नरबळी, भानामती, पैशाचा पाऊस पाडणे या प्रमुख घटनांमध्ये गुन्हे नोंद आहेत.
n मात्र अनेक प्रकरणांमध्ये तक्रार देण्यास कोणी पुढे येत नसल्याने या कायद्यानुसार गुन्हे दाखल होण्याचे प्रमाण कमी आहे.
प्रत्येक बाबीत कार्यकारणभाव असतो. तो शोधण्याचा प्रयत्न केला, तर तो चमत्कार नसून हातचलाखी आहे, हे समजून येईल. त्यामुळे नागरिकांनी हा चमत्कारामागील कार्यकारणभाव शोधण्याचा प्रयत्न केला पाहिजे.
- प्राचार्य विठ्ठल घुले, अं.नि.स.
भानामती कसली,
हे तर खेळ विज्ञानाचे...
या जगात कोणीच चमत्कार करू शकत नाही. विज्ञान आणि हातचलाखी करून सर्वसामान्य नागरिकांची फसवणूक केली जाते. ग्रामीण भागात अज्ञानाचा फायदा घेऊन हे प्रकार होत असतात. भानामती व यासारखे इतर अघोरी प्रकार करून नागरिकांना भीती दाखवून त्यांच्याकडून पैसे उकळले जातात.
भोंदुबाबाकडून दाखविले जाणारे चमत्कार ही कशा पद्धतीची हालचलाखी आहे आणि या चमत्काराला विज्ञानाचा कसा आधार आहे, याविषयी अंधश्रद्धा निर्मूलन समिती सातत्याने शहरी व ग्रामीण भागात जनजागृती करीत आहे. त्यामुळे नागरिकांनीही अंधश्रद्धा ठेवून अशा भोंदुबाबांच्या आहारी जाऊ नये, असे आवाहन अंनिसच्यावतीने करण्यात आले आहे.