परभणी : गृहविलगीकरणातील रुग्णांचा वेळोवेळी घेतलेला पाठपुरावा आणि घरी अस्वस्थता वाढल्यास तातडीने रुग्णालयात भरती करण्याच्या दिलेल्या सल्ल्यामुळे जिल्ह्यात गृहविलगीकरणात कोरोनाबाधिताचा मृत्यू झाल्याची एकही नोंद प्रशासनाकडे नाही.
गृहविलगीकरणात राहून कोरोनावर उपचार घेणाऱ्या रुग्णांची संख्या जिल्ह्यात अधिक आहे. मात्र कमी लक्षणे असणाऱ्या रुग्णांनाच गृहविलगीकरणाचा सल्ला दिला जातो. शक्यतो ५० वर्षांपेक्षा कमी वय असणाऱ्या रुग्णांवरच त्यांच्या घरी उपचार होतात. जिल्ह्याच्या ठिकाणी वाॅररूम तयार केली असून, वैद्यकीय अधिकारी दररोज या रुग्णांच्या प्रकृतीचा पाठपुरावा करतात. परिणामी गृहविलगीकरणात मृत्यू होण्याचे प्रमाण जिल्ह्यात नगण्य असल्याची माहिती जिल्हा आरोग्य विभागाने दिली.
शासकीय रुग्णालयात खाटा उपलब्ध
जिल्ह्यात रुग्णसंख्या वाढल्याने खाटांची संख्या कमी झाल्याची स्थिती असली तरी, अजूनही शासकीय रुग्णालयात खाटा उपलब्ध होत नाहीत, अशी स्थिती सध्या तरी नाही. त्यामुळे गंभीर लक्षणे असणाऱ्या सर्वच रुग्णांना शासकीय रुग्णालयात दाखल करून घेतले जात आहेत. परिणामी गंभीर रुग्ण घरी उपचार घेत असल्याची स्थिती नाही.
४ हजार रुग्ण गृहविलगीकरणात
५ हजार ४५४ ॲक्टिव्ह रुग्णांपैकी ४ हजार १०० रुग्ण गृहविलगीकरणात उपचार घेत आहेत. गृहविलगीकरणातील रुग्णांचीच संख्या सर्वाधिक आहे. कमी लक्षणे असणाऱ्या रुग्णांनाच गृहविलगीकरणाचा सल्ला दिला जातो.
उशिरा का होईना....
कोरोना पॉझिटिव्ह झाल्यानंतर सुरुवातीला रुग्णालयाचा पर्याय टाळला जातो. मात्र प्रकृती अस्वस्थ झाल्यानंतर तिसऱ्या, चौथ्या दिवशी रुग्णालयात जाणाऱ्या रुग्णांचे प्रमाण अधिक आहे. सुरुवातीला रुग्णालयात दाखल होण्यास रुग्ण नकार देतात. मात्र कोरोना झाल्यानंतर तिसऱ्या, चौथ्यादिवशी प्रकृती गंभीर झाल्यास रुग्ण स्वत:हून रुग्णालयात दाखल होत आहेत.
कमी लक्षणे असणाऱ्यांनाच होम आयसोलेशनचा पर्याय आहे. त्यातही होम आयसोलेशनमधील रुग्णांना जिल्हास्तरीय वॉर रूममधून वैद्यकीय अधिकारी फोनद्वारे औषधींची माहिती देतात. त्यानंतर तिसऱ्यादिवशी पुन्हा फोन करून त्यांच्या प्रकृतीची विचारपूस केली जाते.
- डॉ. किशोर सुरवसे, निवासी वैद्यकीय अधिकारी