परभणी : केंद्र शासनाकडून हरभऱ्याला ५ हजार १०० रुपयांचा हमीभाव जाहीर करण्यात आला आहे. तर, दुसरीकडे खाजगी बाजारपेठेत आठ दिवसांपासून ५ हजार २०० रुपयांचा भाव मिळत आहे. त्यामुळे हमीभाव खरेदी केंद्राकडे नोंदणी केलेल्या शेतकऱ्यांनी आता हरभरा विक्री करण्यास पाठ फिरवल्याचे दिसून येत आहे.
शेतकऱ्यांच्या हरभरा या शेतमालाला योग्य भाव मिळावा, यासाठी केंद्र शासनाने ५ हजार १०० रुपयांचा हमीभाव जाहीर केला. मात्र, सुरुवातीला खाजगी बाजारपेठेत ४ हजार १०० ते ४ हजार २०० रुपयांनी हरभरा खरेदी करण्यात येत होता. त्यामुळे जिल्हा मार्केटिंग कार्यालयाच्या वतीने जिल्ह्यातील ७ ठिकाणी हमीभाव खरेदी केंद्रे सुरू करण्यात आली. या केंद्रांकडे ९ हजार ७६४ शेतकऱ्यांनी हरभरा विक्रीसाठी नोंदणी केली. मात्र, खाजगी बाजारपेठेत हरभऱ्याला प्रतिक्विंटल ५ हजार २०० रुपयांचा भाव मिळत आहे. त्यामुळे हरभरा हमीभाव खरेदी केंद्रांकडे नोंदणी केलेल्या शेतकऱ्यांपैकी केवळ ५९३ शेतकऱ्यांनीच आतापर्यंत ६ हजार २१२ क्विंटल हरभरा विक्री केला आहे. उर्वरित साडेआठ हजार शेतकऱ्यांनी आपला शेतमाल खाजगी बाजारपेठेत विक्री करण्यास प्राधान्य दिले आहे. खाजगी बाजारपेठेत हरभऱ्याचा भाव वधारल्याने शेतकऱ्यांमध्ये समाधान व्यक्त होत आहे.