हिस्सी: सेलू तालुक्यातील हिस्सी येथे २ मे रोजी झालेल्या अवकाळी पावसात विद्युत पुरवठा करणारी दोन खांबे वाकल्याने वीजपुरवठा खंडित झाला आहे. मात्र पाच दिवसांपासून हा वीजपुरवठा सुरळीत करण्यास महावितरणमधील अधिकारी व कर्मचाऱ्यांना वेळ मिळाला नसल्याचे दिसून येत आहे.
परिणामी ग्रामस्थांवर पाण्यासाठी भटकंती करण्याची वेळ आली आहे.
हिस्सी गावाला सेलू येथील ३३ केव्ही उपकेंद्र अंतर्गत वीजपुरवठा करण्यात येतो. मात्र २ मे रोजी झालेल्या अवकाळी पावसाने विद्युत पुरवठा करणारे दोन विद्युत खांब जमिनीवर कोसळले. त्यामुळे गावाला होणारा वीजपुरवठा खंडित झाला. हा वीजपुरवठा सुरळीत करण्यासाठी ग्रामस्थांनी अनेक वेळा कार्यकारी अभियंता मुंजाजी आरगडे, उपकार्यकारी अभियंता जनार्धन सोनटक्के यांना साकडे घातले. मात्र या अधिकारी व कर्मचारी यांनी हा वीजपुरवठा सुरळीत करण्याकडे दुर्लक्ष केले. त्यामुळे मागील पाच दिवसापासून हिस्सी ग्रामस्थांना पाण्यासाठी भटकंती करावी लागत आहे. तर दुसरीकडे उन्हाळी हंगामातील भुईमूग हे पीक पाण्याअभावी करपून जात आहे. याकडे महावितरणच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी लक्ष देऊन पाच दिवसांपासून खंडित असलेल्या येथील वीजपुरवठा तत्काळ दुरुस्त करावा, अशी मागणी येथील ग्रामस्थांमधून होत आहे.