रोहयोची कामे सुरू करण्याची मागणी
देवगाव फाटा : सेलू तालुक्यातील ग्रामीण भागात मजुरांना हाताला काम मिळावे, यासाठी रोहयोची कामे सुरू करणे गरजेचे आहे. तालुक्यात अनेक ठिकाणी विविध कामांना मंजुरी मिळाली असून, नियोजनाअभावी कामे खोळंबली आहेत.
मानवत येथे हमीभाव केंद्र सुरू करा
मानवत : तालुक्यातील तूर उत्पादक शेतकऱ्यांनी आपली तूर बाजारात विक्रीसाठी आणण्यासाठी सुरुवात केली आहे. मात्र, हमीदरापेक्षा बाजारपेठेत कमी भाव मिळत असल्याने शेतकऱ्यांचे नुकसान होत आहे. त्यामुळे लवकरात लवकर हमीभाव केंद्र सुरू करावे, अशी मागणी तालुक्यातील तूर उत्पादक शेतकऱ्यांतून होत आहे.
रस्त्यावरील खड्डे बुजविण्याची मागणी
गंगाखेड : गंगाखेड- राणीसावरगाव रस्त्यावर खड्डे पडले असून या खड्ड्यांचा त्रास वाहनधारकांना होत आहे. गंगाखेड- सुप्पामार्गे पिंपळदरी या मार्गावरही खड्डे पडले आहेत. अतिवृष्टीमुळे रस्ते खराब झाले आहेत. वेगाने येणाऱ्या चारचाकी वाहनांच्या चालकांना वळणावर समोरून येणारे वाहन लक्षात येत नाही. त्यातच खड्डे असल्याने अपघात घडण्याची शक्यता निर्माण झाली आहे.
विजेच्या भारनियमनास ग्रामस्थ वैतागले
पूर्णा : तालुक्यातील पिंपळगाव व परिसरात मागील काही दिवसांपासून भारनियमनाव्यतिरिक्त वीजपुरवठा खंडित केला जात आहे. त्यामुळे ग्रामस्थ वैतागले आहेत. वीज पुरवठा सुरळीत करण्याची मागणी होत आहे.
ग्रामीण भागात सर्रासपणे वृक्षतोड
देवगावफाटा: वनविभागाच्या वतीने वृक्ष न तोडणेबाबत जनजागृती होत नसुन वन विभागाच्या दुर्लक्षामुळे मोठ्या प्रमाणात वृक्षतोड होत आहे.तोडलेली वृक्ष ट्रँक्टरने वाहतूक करून नेले जात असताना कोणीही याकडे लक्ष देत नाही. अथवा कारवाई करीत नाहीत. त्यामुळे पर्यावरणास एकप्रकारे हानी पोहचत आहे.
सोनपेठ- पाथरी रस्त्यावर खड्डे
सोनपेठः शहरातून जाणाऱ्या पाथरी -सोनपेठ रस्त्यावर तहसील कार्यालय ते बसस्थानकापर्यंत मोठ्या प्रमाणात खड्डे पडले आहेत. यामधून वाट काढताना वाहनधारकांना कसरत करावी लागत आहे. या रस्त्याची दुरूस्ती करण्याची मागणी वाहनधारकाकडून करण्यात येत आहे.
रिडज ते भोगाव रस्ता दुरुस्तीची मागणी
भोगाव देवी : रिडज ते भोगाव देवी हा तीन किलोमीटर अंतर असलेला रस्ता अनेक महिन्यांपासून नादुरुस्त असून रस्त्यावर जागोजागी खड्डे पडले आहेत. रस्त्यावरील खड्ड्यांमुळे वाहनांचे मोठ्या प्रमाणात नुकसान होत आहे. याकडे लक्ष देऊन रस्ता दुरुस्तीची मागणी होत आहे.