परभणी जिल्ह्यात कोरोना रुग्णांचा आकडा पंचेचाळीस हजारांवर पोहोचला आहे. मागील एक वर्षापासून दररोज रुग्णसंख्या वाढत आहे. याचा सर्वाधिक ताण आरोग्य सेवेतील डॉक्टर व लाॅकडाऊनची अंमलबजावणी करणाऱ्या पोलिसांवर पडत आहे. परिणामी, डॉक्टर व पोलिसांना घरी कुटुंबाला वेळ देणे शक्य होत नसल्याचे दिसून येते. डॉक्टर व पोलिसांच्या लहान मुलांना त्यांच्या बाबांच्या करिअरचे असणारे कुतूहल कोरोनामुळे कमी झाले आहे. एरवी मी बाबांसारखा डॉक्टर, पोलीस होणार असे ठरविणाऱ्या बालकांनी आता पोलीस, डॉक्टर होण्यास नकारघंटा दर्शविली आहे.
कोरोना योद्धा शासकीय रुग्णालयातील डॉक्टर ३५०
आरोग्य कर्मचारी १०००
पोलीस अधिकारी १३२
पोलीस कर्मचारी १६९९
पोलीस व्हायला आवडेल; पण...
लहानपणापासून बाबांचा पोलीसचा ड्रेस पाहून वाटत होते की, आपणही मोठे झाल्यावर पोलीस अधिकारी व्हावे; पण मागील एक वर्षापासून कोरोना कालावधीत बाबा मला वेळ देऊ शकत नाहीत. त्यांना घरी येणे जमत नसल्याने पोलीस होणे नको.
- श्रेयस तोटेवाड
माझ्या बाबांकडे पाहिल्यावर त्यांच्यासारखे पोलीस होण्याचे स्वप्न मी पाहत होतो; पण दररोज कामाचा ताण आणि माझ्याशी खेळायला त्यांना वेळ नसल्याने पोलीस बनण्यापेक्षा अधिकारी व्हायला आवडेल.
- सोहम शिराळकर
पोलिसांचा धाक पाहून आणि ड्रेस पाहून सगळेच घाबरतात. तसेच मी पण लहानपणी घाबरत होतो; पण कोरोनाला आता सगळे घाबरत असल्याने बाबांना नेहमी बंदोबस्त आणि काम यामुळे वेळ मिळत नाही. परिणामी, कोरोनाच्या भीतीने पोलीस होण्यापेक्षा इतर क्षेत्रात काम करायला आवडेल.
- यशराज योगेश चरकपल्ली.
कोरोना असेल तर डॉक्टरकी नको
आई आणि बाबा दोघेही डॉक्टर असल्याने त्यांची घरी राहण्याची वेळ निश्चित नाही. केव्हाही पेशंट आल्यास दवाखान्यात जावे लागते. यामुळे त्यांच्यासोबत वेळ घालवता येत नाही. हाच प्रकार लक्षात घेता डॉक्टर होण्यापेक्षा शिक्षक होण्यासाठी माझी पसंती राहील.
-वरदा सुधांशू देशमुख.
डॉक्टरांना नेहमीच सामाजिक बांधिलकी जोपासावी लागते. आई-बाबांकडे पाहून सध्याच्या परिस्थितीत डॉक्टर व्हावे वाटत नसले तरी माझे ठरविलेले डॉक्टर होण्याचे स्वप्न मी पूर्ण करणार आहे.
- शुभदा सुभाष सिसोदिया.
मुलांना जास्त वेळ देता आला नाही तरी जो वेळ द्याल त्यात जास्तीत जास्त एकरूप व्हावे. मुलांनी हेच करावे, तेच क्षेत्र निवडावे, असा विचार करू नये. लहान मुलांशी सुसंवाद साधावा. त्यांच्यासमोर सतत फेसबुक, व्हाँट्सअप आणि सोशल माध्यमातील विविध बाबींची चर्चा करून त्यांच्या मनात भीती निर्माण करू नये. मुलांच्या कल्पनाविश्वाला वाव देण्याचा प्रयत्न करावा. डाॅ. जगदीश नाईक, मानसोपचारतज्ज्ञ.