पाणी समस्या सुटता सुटेना
परभणी : शहरातील पाण्याची समस्या अद्यापही कायम आहे. विशेष म्हणजे शहरवासीयांना पाणीपुरवठा करण्यासाठी स्वतंत्र योजना कार्यान्वित झाली आहे. मात्र, या योजनेवर नवीन नळ जोडण्या घेतल्या नसल्याने शहराचा पाणीपुरवठा विस्कळीत झाला आहे. शहरवासीयांना सध्या आठ ते दहा दिवसांतून एकदा पाणीपुरवठा होत आहे.
आरक्षण खिडकीवर प्रवाशांची गर्दी
परभणी : येथील रेल्वेस्थानक भागात एकाच आरक्षण खिडकीवरून रेल्वे तिकिटाचे आरक्षण होत आहे. त्यामुळे प्रवाशांची गर्दी वाढली आहे. स्थानकावर आरक्षण खिडक्यांची संख्या वाढवावी, अशी प्रवाशांची मागणी आहे. मात्र, त्याकडे प्रशासन दुर्लक्ष करीत आहे.
रेल्वे उड्डाणपुलाचे काम संथगतीने
परभणी : येथील कृषी विद्यापीठ परिसरामध्ये रेल्वेच्या उड्डाणपुलाचे काम हाती घेण्यात आले आहे. सहा महिन्यांपासून हे काम संथगतीने सुरू आहे. सध्या विद्यापीठ भागात कामाला प्रारंभ करण्यात आला. त्यामुळे हा मार्ग वाहतुकीसाठी बंद ठेवला आहे. रेल्वे प्रशासनाने पुलाचे काम गतीने पूर्ण करावे, अशी वाहनधारकांची मागणी आहे.
गव्हाणे चौकातील कारंजे पुन्हा बंद
परभणी : येथील गव्हाणे चौकात लाखो रुपयांचा खर्च करून कारंज्याची उभारणी करण्यात आली. मात्र, हे कारंजे नियमित सुरू ठेवले जात नाही. त्यामुळे वारंवार बिघाड होणे, तसेच कारंज्याची दुरवस्था होण्याचे प्रकार होत आहेत. मनपा प्रशासनाने याकडे लक्ष देऊन सुशोभीकरणासाठी उभारलेले कारंजे नियमित सुरू ठेवावेत, अशी मागणी होत आहे.
राजगोपालाचारी उद्यानाची दुरवस्था
परभणी : शहरातील राजगोपालाचारी उद्यानाची दुरवस्था झाली आहे. या उद्यानात विविध झाडे आणि लॉन लावण्यात आली होती. मात्र, नियमित देखभाल दुरुस्ती होत नाही. त्यामुळे सध्या उद्यानाची दुरवस्था झाली आहे. त्याचप्रमाणे मुलांसाठी बसविलेल्या खेळण्यांचीही दुरवस्था झाली असून, मनपाने याकडे लक्ष द्यावे, अशी मागणी होत आहे.
पं.स.तील सॅनिटायझर मशीन बंद
परभणी : येथील पंचायत समिती कार्यालायात बसविलेली सॅनिटायझर मशीन दोन महिन्यांपासून बंद आहे. कोरोनाचा संसर्ग रोखण्यासाठी प्रशासनाने ही मशीन बसविली होती; परंतु त्यात सध्या सॅनिटायझर ठेवले जात नाही. त्यामुळे ही मशीन शोभेची ठरली आहे.